मालवण : गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांच्या किल्ले सिंधुदुर्गवर वीजपुरवठा करणाऱ्या जीर्ण वीज वाहिन्या बदलण्याची कार्यवाही वीज वितरणकडून हाती घेण्यात आली आहे. मालवण किनारपट्टी ते किल्ले सिंधुदुर्ग या समुद्रीमार्गावरील जीर्ण विद्युतखांब व वीजवाहिन्या बदलण्याची कार्यवाही वीज वितरणकडून सुरू करण्यात येणार आहे. उच्च दाबाच्या वीज वाहिन्या बदलत असताना कोणताही अपघात होऊ नये यासाठी किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय वीज वितरणच्या कार्यवाहीवेळी काही दिवस बंद ठेवावे, अशा नोटिसा व्यावसायिकांना बजावण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असताना ऐन पर्यटन हंगामातच स्थानिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागणार असल्याने पर्यटन व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मालवण दांडेश्वर मंदिर ते किल्ले सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. वीज खांबही गंजलेल्या स्थितीत आहेत. यावर भाजप, शिवसेना तसेच प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्यानंतर टॉवर लाईन टाकण्याची प्रक्रिया वीज वितरण हाती घेणार आहे. अशा स्थितीत हे कामकाज सुरू असताना त्याठिकाणी समुद्रात चालणारे पर्यटन व्यवसाय काही काळ बंद ठेवावे, असे पत्र वीज वितरणने व्यावसायिकांना पाठविले आहेत. जलक्रीडा बंद ठेवणार ? पर्यटन हंगामात व्यवसायही बुडण्याबरोबर पर्यटकांनाही जलक्रीडेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वीज वितरण, जलक्रीडा व्यावसायिक व बंदर विभाग कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, वीज वितरणकडून जीर्ण विद्युत खांब व वाहिन्या बदलण्याच्या सुरू होणाऱ्या कार्यवाहीबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
किल्ले सिंधुदुर्गच्या वीज वाहिन्या बदलण्याची कार्यवाही सुरूहोणार
By admin | Published: September 23, 2016 11:16 PM