vidhan sabha-कार्यकर्त्यांनी पकडले नेत्यांचे कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 10:40 AM2019-10-03T10:40:20+5:302019-10-03T10:45:35+5:30
मागील चुका सुधारून आगामी निवडणुकीत जिद्दीने लढा, असे आवाहन यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
कुडाळ : निवडणुका जवळ आल्या म्हणून केवळ मेळावे, बैठका न घेता पक्ष संघटनावाढीसाठी कार्यरत रहा. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील मतदारांना सांभाळा, असा सल्ला जिल्हा काँग्रेसच्या सभेत कार्यकर्त्यांनी देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. मागील चुका सुधारून आगामी निवडणुकीत जिद्दीने लढा, असे आवाहन यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा येथील महालक्ष्मी सभागृहात जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पुष्पसेन सावंत, नवीनचंद्र बांदिवडेकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, राजू मसुरकर, दादा परब, प्रकाश जैतापकर, आबा मुंज, विद्याप्रसाद बांदेकर, मंदार शिरसाट, बाळा गावडे, बाळू अंधारी, विजय प्रभू, दिलीप नार्वेकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना पक्ष संघटनावाढीकडे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला. पक्षसंघटना वाढीकडे लक्ष द्या. जे गेले त्यांना जाऊ द्या, पण आहेत त्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेऊन पक्षसंघटना वाढवा, अशा भावना व्यक्त केल्या.
अॅड. दिलीप नार्वेकर यांनी जिल्ह्यात येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत करायला आम्ही हजारो रुपये खर्च करतो. मात्र, हे नेते नंतर दुसऱ्या पक्षात जातात. मग त्याचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला. आता ईडीच्या भीतीने बहुतेक जण भाजपकडे प्रवेशासाठी धडपडत आहेत. मात्र, हा कायदा काँग्रेसच्याच काळात बनविलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जे पक्ष सोडून गेले आहेत किंवा आताच्या भाजप नेत्यांना नक्कीच ईडीचे चटके नक्कीच बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.
पुष्पसेन सावंत यांनी खासदार विनायक राऊत हे मालवणमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप्पा पराडकरसारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन फिरत असल्याचा आरोप केला. आता हा दहशतवाद गृहमंत्र्यांना दिसत नाही का? असा टोलाही त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला.
काँग्रेसचे स्पिरीट सांगू नये : विकास सावंत
जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले, काँग्रेससाठी मी नेहमीच कार्यरत आहे. मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानसभेची आॅफर दिली होती. मात्र, मी कधीही पक्ष सोडून गेलो नाही. त्यामुळे काँग्रेसचे स्पिरीट मला कोणी सांगू नये. काँग्रेस हा बुडणारा पक्ष अशी टीका करणारे सुधीर सावंतही पक्षात येत आहेत. वरिष्ठ नेते योग्य उमेदवार देतील आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची असेल, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसकडे कार्यालय नसल्याची शोकांतिका
आतापर्यंत काँग्रेसचे अनेक मंत्री येऊन गेले. मात्र, या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचे एकही कार्यालय नाही किंवा जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच इंचाही जागाही नाही. ही काँग्रेसची शोकांतिका असल्याची खंत आबा मुंज यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा कायम आहे, पण नेत्यांनीच पक्षांतराचा सपाटा चालविल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.