सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीला 2200 पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून एकूण तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी निवडणुकीवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षकसौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक काळात कोणतीही घटना घडली नाही. कुडाळ येथे दोन अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या समवेत सावंतवाडीतील निवडणूक केंद्राची पाहणी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याशी चर्चा केली.यावेळी अग्रवाल म्हणाले, निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सुरळित होती. नाक्या नाक्यावर गाडी तपासणी करण्यात आली सर्वत्र योग्य पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून तब्बल दोन हजार पोलिस कर्मचारी आले आहेत तसेच 150 अधिकारी तैनात आहेत. त्याशिवाय होमगार्ड वैगरे मिळून तीन हजार पोलिस कर्मचारी हे निवडणूक बंदोबस्तात आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या ही कार्यरत असल्याचेही सांगितले.सोशल मीडीयावर विशेष लक्ष सोशल मीडीयावर टाकण्यात येणाऱ्या काही पोस्ट या वादग्रस्त असतात त्याबाबत तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाते त्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात एक टिम तैनात ठेवण्यात आली असून असे कोणत्याही वादग्रस्त पोस्ट आल्यानंतर त्या तत्काळ काढून टाकण्यात येतात तसेच पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला समज दिली जाते तसेच एकदमच वादग्रस्त असेल तर गुन्हा दाखल करण्यात येतो असेही अग्रवाल यांनी सांगितले.
लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, सोशल मीडीयावर विशेष लक्ष
By अनंत खं.जाधव | Published: May 06, 2024 4:14 PM