सिंधुदुर्ग - शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. या माध्यमातून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे आज कोकणात दाखल झाले आहेत. कुडाळ येथून त्यांनी बंडखोर आमदारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यावेळी, त्यांनी बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावरही नाव न घेता टिका केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतरही 40 आमदारांना पुन्हा एकदा बंडखोराची उपमा दिली.
आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. गद्दार, निर्लज्ज, विश्वासघातकी असे शब्द वापरत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली. आमच्या पाठिंत खंजीर खुपसण्याचं काम यांनी केल्याचंही ते म्हणाले. ''डिसेंबर महिन्यात कोविडचा काळ वाढत होता, त्यावेळी उद्धव ठाकरे हॉस्पीटलमधून संवाद साधत होते, व्हॉट्सअपद्वारे संपर्कात होते. शिवसेना जिल्हा प्रमुखांशी, शासन-प्रशासन, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी ते कोविडमधून लोकांना कसं वाचवायचं यासंदर्भातच बोलत होते. मंत्रीमंडळाच्या बैठकाही व्हीसीमधून घेत होते. एकीकडे हे सगळं सुरू असताना, दुसरीकडे गद्दारांचे नेते पक्ष फोडायला सुरुवात करत होते. आमदारांना विचारत होते, माझ्यासोबत येतो का, माझ्यासोबत येतो का...'' अशी टिका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली.
तसेच, आज बोलायची वेळ आली म्हणून बोलत आहे, आम्हाला वाटायचं ही 40 लोकं आपलीच आहेत. आम्हाला परिवार म्हणून सांभाळून घेतील. आपल्यासोबतच राहतील, पण याच गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ आमच्याच नाही तर माणूसकीच्या पाठीत खंजीर खुपसला. अहो, हे गद्दार स्वत:च्या घरातल्यांचे झाले नाहीत, परिवाराचे नाहीत झाले, कुटुंबांचे नाहीत झाले, ते महाराष्ट्राचे काय होणार? अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर 40 आमदारांवर टिका केली.
राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावा
आदित्य ठाकरें म्हणाले, बंड आणि उठाव करायला हिंमत लागते. ती हिंमत या गद्दारांमध्ये नाही. हिंमत असती तर या गद्दारांनी इथं राहून बंड केले असते. त्यासाठी सुरत, गुवाहाटीकडे जायची गरज नव्हती. महाराष्ट्राची वृत्ती असी नाही असे खडसावत राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे या असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिले.
ही गद्दारी माणुसकीसोबत
बंडखोरांनी केलेली गद्दारी ही फक्त शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसून ही गद्दारी माणुसकीसोबत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या बंडखोर नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना सर्वकाही दिले. पण त्यांनी गद्दारी केली. इतक घाणेरडे राजकारण मी कधीही पाहिले नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती की पक्ष फोडा, गद्दारी करा. ज्या माणसाने घडवले, ओळख दिली त्याच माणसाच्या पाठित या बंडखोरांनी खंचीर खुपसला.