मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मालवण येथे मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले, यावेळी दोन्ही गट आक्रमक झाले होते, तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन तासांनंतर किल्ल्यावरुन आदित्य ठाकरे बाहेर पडले. यानंतर त्यांनी मोर्चास्थळी भरपावसात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपासह महायुती सरकार टीका केली.
मोर्चावेळी मालवणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसातच आमदार आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. " आपल्या मोर्चामध्ये काही चिंधीचोर आले,मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज बालिशपणा होत होता. हा भाजपचा भ्रष्टाचार आहे. इकडचे स्थानिक खासदार कसे जिंकूण आले आहेत आपल्याला माहिती आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला. या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तर आपण तिथं गेलं पाहिजे. आपण या मातीतील लोक आहोत. ही परिस्थिती देशात आहे. दहा वर्षात भाजपाने जी काम केली आहेत, त्या कामाला गळती लागली आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
"देशात कोणताही एक भाग सोडलेला नाही जिथे भाजपाने भ्रष्टाचार केलेला नाही. मुंबईची मेट्रो असो, मुंबई महापालिकेतील घोटाळे असो. अयोध्येमधील राम मंदिरातही गळती लागली आहे. या कामाची जगभराच जाहीरात केली. नवीन संसद भवनातही पाणी गळत आहे. दिल्ली विमानतळाचे छतही पडले, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
"मालवण येथील या पुतळ्याचे कॉन्ट्रक्ट भाजपाने मिंधे सरकारने कोणाला दिले होते.हे जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपटे? कोणताही अनुभव नसताना तुम्ही हे काम कसं दिलं. अमेरिकेतली एक पुतळा समुद्र किनारी १३८ वर्षे टीकला आहे. पण आपला हा पुतळा ८ महिन्यात कसा कोसळला? हे आपटे कोण आहेत कुठे आहेत हे आम्हाला कळालं पाहिजे. तो आपटे कुणाचा तरी मित्र आहे म्हणून त्यांना काम मिळालं. याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही चार वर्षापूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव दिलं आहे, पण मोदी सरकारने अजूनही या नावाला मान्यता दिलेली नाही. यांचा महाराष्ट्रातील या नावांचा विरोध का आहे? यांचा महाराष्ट्रद्वेष का आहे?, असा आरोपही ठाकरे यांनी केला. समोरुन अनेक अफजल येतील, ईडी, सीबीआय आणतील पण आम्ही झुकणार नाही हे सांगा, आम्ही लढायला तयार आहे, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी चॅलेंज दिलं.