कुडाळ : नागरिकांचा विरोध डावलून येथील केळबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या मोरीची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात येथे पाणी तुंबल्यास त्याला सर्वस्वी सत्ताधारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी दिला आहे. प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून नियोजनशून्य व पैशांची उधळपट्टी करून विकासकामे सुरू असल्याचा आरोपही भोगटे यांनी केला आहे.कुडाळ एसटी बसस्थानक ते श्री देवी केळबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर माऊली कॉम्प्लेक्सजवळ असलेली जुनी मोरी नव्याने बांधण्यात आली आहे. मात्र, ही मोरी आवश्यकतेपेक्षा उंच बांधण्यात आली आहे.
मोरीची उंची वाढवू नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती. उंची वाढविल्यास तेथील सखल भागात असलेल्या गटारातील पाणी तुंबून सर्व पाणी आजूबाजूच्या परिसरातील दुकाने व घरांमध्ये पसरण्याची भीती आहे. मात्र, स्थानिकांचे मत आणि पुढे होणारे दुष्परिणाम विचारात न घेता या मोरीचे बांधकाम करण्यात आले आहे.पावसाळ्यात मोरीच्या आजूबाजूच्या सखल परिसरात पावसाचे व गटारातील पाणी तुंबून ते दुकाने व घरांमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. याचा नाहक त्रास येथील व्यापारी व नागरिकांना सहन करावा लागणार आहे, असे भोगटे यांनी म्हटले आहे.नागरिकांचा विरोध असतानाही मोरीची उंची जास्त ठेवल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास तसेच अन्य समस्या उद्भवल्यास त्याला सत्ताधारी व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा भोगटे यांनी दिला आहे. तसेच या मोरीची उंची कमी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.