सिंधुदुर्गनगरी : आंगणेवाडी यात्रा २५ फेब्रुवारी तर कुणकेश्वर यात्रा ४ मार्च रोजी होणार आहे. आंगणेवाडी व कुणकेश्वर यांत्रांच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांनी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या सतर्कतेने पार पाडाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत केली.आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रे संदर्भात देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सोबत यात्रेतील सुविधा निर्माण करणे तसेच अडीअडचणी बाबत अधिकारी वर्गासमवेत बैठक झाली.
बैठकीस पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, उपविभागीय अधिकारी निता शिंदे, विकास सूर्यवंशी, आंगणेवाडी देवस्थानचे नरेश आंगणे, अनंत आंगणे, गणेश आंगणे, दिगंबर आंगणे, दत्तात्रेय आंगणे, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष किशोर पेडणेकर, विकास तेजम, चंद्रशेखर बोंडाळे, जयदत्त नाणेरकर, बाळकृष्ण मुणगेकर तसेच सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापन कक्षाने यात्रेपूर्वी रंगीत तालीम घ्यावी, दोन्ही ठिकाणच्या यात्रा मार्गावरील झाडी तोडणे तसेच रस्त्यांच्या साईड पट्ट्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रे पूर्वी पूर्ण करावीत. बी.एस.एन.एल विभागाने संदेशवहन यंत्रणा सुव्यवस्थित करावी, वीज कंपनीने यात्रा कालावधी दरम्यान वीज पुरवठा सुस्थितीत ठेवावा.
अन्न वऔषध प्रशासनाने यात्रा स्थळावरील स्टॉलची तपासणी करावी, कणकवली व वेंगुर्ला नगरपालिकेने अग्मीशमन यंत्रणा यात्रांसाठी पुरवावी, आरोग्य विभागाने आरोग्य पथक द्यावे, देवस्थान समितीने यात्रा कालावधीत स्वच्छता ठेवण्याचे नियोजन संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकायार्ने करावे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बस फेऱ्यांचे नियोजन करावे आदी सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या.