कुडाळ : कोरोना आपत्ती काळात विरोधी पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी प्रशासन समन्वय राखत नसल्याबाबत कुडाळ प्रांताधिकारी यांना सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्यावतीने निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच पालकमंत्री यांच्या आदेशानुसार आपल्या प्रशासनाने केवळ विरोधी पक्ष म्हणून या मंडळींना डावलले आहे, का? असाही सवाल या निवेदनात उपस्थित केला.सदरचे हे निवेदन प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक संचालक व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व अतुल काळसेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, कुडाळ तालुकाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस अनिल (बंडया) सावंत, आचरा मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण दीपक पाटकर, नगरसेवक राकेश कांदे, पावशी माजी सरपंच पप्या तवटे तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.या निवेदनात नमुद करण्यात आले की, गेले दिड महिने कोरोना संकटाशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशासन आणि निवडक राजकीय पक्ष यासाठी चांगले काम करत आहेत. काही काळापर्यंत हे सर्व ठीक होते. परंतु सध्याची आणि येऊ घातलेली परिस्थिती पाहता यावर हे भागणार नाही .भाजपा येथे विरोधी पक्ष असला तरी जिल्ह्यातील एक प्रमुख पक्ष आहे. कुडाळ-मालवण या मतदारसंघात जिल्हा परिषद, एक पंचायत समिती, एक नगरपालिका आणि ७० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आहेत. भाजपने गेल्या दीड महिन्याच्या काळात सुमारे २० हजार गरजुंना जेवण व शिधा वाटप केलेले आहे. ३०० पीपीई किट, मास्क इत्यादी प्रकारची सेवा दिलेली आहे. तसेच लॉकडाउन चारमध्येही कमळ थाळीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था चालू आहे.पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रशासन विरोधी पक्षनेत्यांसोबत या विषयात बैठका घेताना दिसतात, पण या मतदार संघात मात्र या संकेताला फाटा देण्यात आलेला आहे, असाही आरोप करण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे तसेच रेडझोनमधून येणाऱ्याबाबत तसेच योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत अनेक मागण्या त्यांनी निवेदनातून करत भाजपा प्रशासनाशी अत्यंत समन्वयाने वागत आहे. प्रशासनाने पदाधिकाºयांना विश्वासात घ्यावे असे यावेळी सांगण्यात आले.