सावंतवाडी : शेतकऱ्यांसाठी शासनाने जे धोरण अवलंबिले आहे, त्यात जिल्ह्यातील मच्छिमारांनासुद्धा सामावून घेण्यात यावे. त्यांना शीतगृह, कर्जमाफी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर मुख्यमंंत्र्यांच्या शेतकऱ्यांसोबत शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेत अतिमहत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी जूनमध्ये अधिवेशनात नवीन कायदा केला जाईल. शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात जो व्यापारी माल घेईल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.ज्या शेतकऱ्यांना वाढीव वीजबिले आली त्यांचा पुनर्विचार केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांची थकित वीजबिले माफ करण्यात येणार असल्याचे मुुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याची माहिती तेली यांनी दिली. शेतकऱ्यांचा माल वाया जाऊ नये यासाठी शीतगृहाची साखळी निर्माण करण्यात येणार आहे. गोडाऊन व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच नाशिवंत मालासाठी प्रक्रिया उद्योग राबविण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला.
शेतकऱ्यांच्या धोरणात मच्छिमारांना सामावून घ्या
By admin | Published: June 04, 2017 1:36 AM