बांदा : समाजात कित्येक मुले आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. दरवर्षी अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम कोकण कला व शिक्षण विकास संस्था करत आहे. यावर्षी भाऊ सावंत दत्तक विद्यार्थी योजनेंतर्गत डोंगरपाल (ता. सावंतवाडी) हायस्कूलमधील तीन विद्यार्थ्यांना दत्तक घेत संस्थेने त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलला आहे.या प्रशाळेतील अक्षता चंद्रकांत डिंगणेकर, पूनम धर्माजी गवस व अक्षता अशोक धवण या विद्यार्थिनींच्या वार्षिक खर्चाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देविदास नाडकर्णी होते. यावेळी व्यासपीठावर गुणाजी गवस, संस्थेचे सचिव गुरुदास केळुस्कर, सूरज कुबल, विकास कुबल, डिंगणे ग्रामपंचायत सदस्य जयेश सावंत, किरण सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण देसाई उपस्थित होते. शिक्षणाने माणूस स्वावलंबी बनतो. त्यामुळे आपल्या भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहूू नये, यासाठी येत्या वर्षभरात दशक्रोशीतील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी यावेळी सांगितले. गुरुदास केळुस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तीन विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
By admin | Published: November 27, 2015 8:51 PM