मालवण : उपनगराध्यक्ष पदासाठी आज, शुक्रवारी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजन वराडकर यांना नशिबाने साथ दिल्याने त्यांची वर्णी लागली. शहर विकास आघाडीशी बंडखोरी करून काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीस सामोरे गेलेले राजन वराडकर व शहर विकास आघाडीच्या दर्शना कासवकर यांना निवडणुकीत समान मते मिळाली. यानंतर पीठासन अधिकारी रवींद्र बोंबले यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावाने काढलेल्या चिठ्ठ्यांच्या सोडतीत राजन वराडकर यांना उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागली. मालवण नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूकघेण्यात आली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडविण्याच्या इराद्याने निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसने नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखत शहर विकास आघाडीचे सदस्य असलेल्या राजन वराडकर यांनाच उपनगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरविले. विशेष सभेपूर्वी वराडकर यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र सादर केले. या पत्रावर सूचक म्हणून आचरेकर व अनुमोदक म्हणून मंदार केणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, मंदार केणी, जॉन नऱ्होना, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, संतोषी कांदळकर आदी उपस्थित होते. काँग्रेसने उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर शहर विकास आघाडीकडून नगरसेविका दर्शना कासवकर यांनी आपले नामनिर्देशनपत्र मुख्याधिकाऱ्यांजवळ सादर केले. यावेळी गटनेते रविकिरण आपटे, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, नितीन वाळके, सेजल परब, पूजा करलकर, रेजिना डिसोझा, शिला गिरकर आदी उपस्थित होते. कासवकर यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून महेश जावकर व अनुमोदक म्हणून रेजिना डिसोझा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. (प्रतिनिधी)
मालवण विकास आघाडीत फूट
By admin | Published: June 20, 2014 11:07 PM