वेंगुर्ला : वेंगुर्ला पंचायत समितीतील माहिती व कागदपत्रे पुरविणाऱ्या त्या ग्रामपंचायत आस्थापना कर्मचाऱ्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने मंगळवारी उभादांडा ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य उपोषणास बसले होते. पंचायत समिती स्तरावर समिती नेमून कार्यालयामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन त्यांना गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी दिल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले.पंचायत समितीच्या ग्रामपंचायत आस्थापना कर्मचारी यांनी आद्याक्षरे असलेले परंतु गटविकास अधिकारी यांची सही नसलेले, पंचायत समितीकडील पत्राचा जावक क्रमांक व दिनांक नसलेले पत्र परस्पर त्रयस्थ व्यक्तीला दिले.
त्या कागदपत्राच्या आधारे त्या व्यक्तीने सरपंच पद व ग्रामपंचायत सभासद पदे धोक्यात आणू अशी धमकी दिली होती. मात्र, गटविकास अधिकारी यांचे सही नसलेले पत्र त्रयस्थ व्यक्तीकडे पोहोचले कसे ? याचा अर्थ पंचायत समिती ग्रामपंचायत आस्थापना कर्मचारी परस्पर काही माहिती व कागदपत्रे पुरवित असल्याची शक्यता असल्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी सरपंच देवेंद्र डिचोलकर यांनी पंचायत समितीकडे केली होती.मात्र, एक महिना होत आला तरी कोणतीच कारवाई केली नसल्याने त्यांनी पुन्हा १५ मार्च २०२१ पर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास १६ मार्चपासून ग्रामपंचायत सदस्यांसह पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.या उपोषणकर्त्यांची सभापती अनुश्री कांबळी, शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य यशवंत परब, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, नगरसेवक तुषार साबळे, सामाजिक कार्यकर्ते हितेश धुरी आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तर गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेअंती पंचायत समिती स्तरावर समिती नेमून कार्यालयामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी दिल्यावर सरपंचासह सदस्यांनी उपोषण मागे घेतले.लक्ष न दिल्याने केले उपोषणगेल्या पंधरा दिवसात पंचायत समिती प्रशासनाने यावर लक्ष न दिल्याने मंगळवारी सरपंच देवेंद्र डिचोलकर, ग्रामपंचायत सदस्य आशु फर्नांडिस, गणेश चेंदवणकर, श्रद्धा कुडाळकर, टीना आल्मेडा, अपेक्षा बागायतकर, सावली आडारकर, मनस्वी सावंत, दीपाली वेंगुर्लेकर, दया खर्डे, शिवाजी पडवळ यांनी उपोषण सुरू केले.वेंगुर्ला पंचायत समितीसमोर उभादांडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्य उपोषणास बसले होते.