सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालावल व कर्ली येथील हातपाटीच्या ६७ रेती गटांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मान्यता दिली आहे. यामुळे वाळू व्यावसायिकांना महसूल भरल्यानंतर उत्खननाचे परवाने देण्याची कार्यवाही दिवाळीनंतर केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदारांनी परवान्यासाठी खनिकर्म विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी करत जिल्हावासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी आपल्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. जिल्ह्यातील कर्ली व कालावल खाडीतील रेतीगट निश्चित करून त्याच्या उत्खननासाठी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, कालावल खाडीमधील २४ गट व कर्ली खाडीमधील ४३ रेती गटांचा समावेश आहे. या ६७ रेती गटांना हातपाटीद्वारे उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मुळात याला महिनाभर उशीर झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या रेतीगटासाठीचे परवाने वितरणाचे काम दिवाळीनंतर हाती घेण्यात येणार आहे. रॉयल्टी भरून घेऊन वाळू व्यावसायिकांना परवाने वितरीत केले जाणार आहेत. यासाठी संबंधित व्यावसायिकांनी खनिकर्म विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अवैध वाळू वाहतूक किंवा उत्खननातून केलेल्या कारवाईतून प्रशासनास महसूल कमी मिळतो. मात्र, वाळूचा लिलाव जाहीर करून त्यातून जो महसूल मिळतो तो मोठ्या प्रमाणात असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) सिंधुदुर्गवासीय अभ्यासू सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ असून त्यांना नियम व कायद्याची जाणीव आहे. बेकायदेशीर गोष्टींसाठी माझ्याकडे कुठलेही पदाधिकारी येत नाहीत. माझ्या कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्याशी संवाद साधताना अधिकाऱ्यांशीच बोलल्यासारखे वाटते. त्यामुळे काम करताना आनंद मिळतो, अशी प्रशंसा करीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हावासीयांबद्दल असणाऱ्या प्रेमळ भावनांना वाट करून दिली.
कालावल, कर्ली येथील रेती उत्खनन दिवाळीनंतर
By admin | Published: October 28, 2016 11:07 PM