प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील सागरी क्षेत्रात शासनाचा बंदी आदेश मोडून सुरू असलेल्या पर्ससीन मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमारांनी एल्गार पुकारल्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी त्याची गंभीर दखल घेतली. बंदी आदेश मोडणाऱ्या पर्ससीनवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर व ७ नौकांवर कारवाई झाल्यानंतर पर्ससीन मासेमारी थंडावली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, कारवाईबाबतचे धोरण सैल झाल्यास पुन्हा पर्ससीन मासेमारीचे सत्र सुरू होण्याची भीती मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे. बंदीकाळात सुरू असलेली पर्ससीन मासेमारी बंद करावी, या पारंपरिक मच्छीमारांच्या मागणीनुसार दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेतली. प्रकाशझोताचा वापर करून पर्ससीन व मिनी पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या नौकांच्या मालक व मच्छीमारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या नेत्यांशी या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी पर्ससीन मासेमारी न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे बजावले. यावेळी झालेल्या चर्चेत पर्ससीन नौकामालकांनी ते सागरी क्षेत्रात ५० नॉटिकल क्षेत्राबाहेर मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छीमारांवर कोणताही अन्याय होत नसल्याची बाजू मांडली. परंतु, राज्य शासनाने १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत पर्ससीन मासेमारीवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या आदेशाचे पालन होणारच, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच मत्स्य व बंदर विभागाला अशा बंदी मोडणाऱ्या पर्ससीन नौकांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ७ पर्ससीन नौका मिरकरवाडा बंदरात सील करून ठेवण्यात आल्या आहेत. या नौकांच्या केबिनला सील करण्यात आले असून, त्यामुळे नौका सुरू करणे शक्य होणार नाही. जिल्हा प्रशासनाच्या कडक धोरणामुळे पर्ससीन मासेमारी सध्यातरी पूर्णत: बंद झाली आहे. मात्र कारवाईबाबतचे धोरण यंत्रणेकडून पुन्हा सैल होण्याची भीती पारंपरिक मच्छीमारांना वाटत आहे. त्यामुळे बंदी आदेशाच्या कडक अंमलबजावणी बाबतच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने आढावा घ्यावा, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे. पर्ससीन मासेमारी थंडावल्याने मिरकरवाडासह अनेक बंदरांमध्ये मच्छीची आवक कमी झाली आहे. मात्र, पर्ससीन नौकाधारकांमध्ये यामुळे अस्वस्थतेचे वातावरण आहे. याआधी पर्ससीन नौका ५० नॉटिकल क्षेत्राच्या बाहेर कधीच मासेमारी करीत नव्हत्या. पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधानंतर ५० नॉटिकल सागरी क्षेत्राकडे पर्ससीन मच्छीमारांनी आपला मोर्चा वळवला होता. देशातील कोणत्याही सागरी राज्यात पर्ससीन मासेमारीला महाराष्ट्र वगळता बंदी नाही. ५० नॉटिकल सागरी क्षेत्रात पारंपरिक मच्छीमारी नौका जात नाहीत. पर्ससीन नौकांवर बंदी घातल्याने या खोल सागरी क्षेत्रातील मासे अन्य राज्यांतील बोटी पळवणार असल्याचा दावा पर्ससीन मच्छीमारी नौकामालकांकडून केला जात आहे. प्रकाशझोतावर मासेमारी...पर्ससीन मासेमारीसाठी ५० नॉटिकल सागरी क्षेत्रात जाणाऱ्या ६० नौकांपैकी २० नौकाच मच्छीमारी करतात तर उर्वरित ४० नौका या मच्छीमारी करणाऱ्या नौकांच्या दोन्ही बाजूने राहून पाण्यात प्रखर प्रकाशझोत टाकतात. त्यामुळे मासे या झोताकडे आकर्षित होऊन जाळ्यात येतात.
आदेशानंतर पर्ससीन मासेमारी थंडावली...
By admin | Published: April 09, 2017 11:54 PM