सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर आता आम्हाला प्लास्टिकमुक्त जिल्हा करायचा आहे, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केली. सावंतवाडी पंचायत समितीने आयोजित केलेला लोकोत्सव जिल्ह्यात उत्कृष्ट झाला असून, आपली आता जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग, उपसभापती रणजित देसाई, सभापती प्रमोद सावंत, आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी सभापती प्रमोद कामत, प्रियंका गावडे, उपसभापती महेश सारंग, गटविकास अधिकारी मोहन भोई, अलिबागचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा परिषद सदस्या रिटा अल्फान्सो, वृंदा सारंग, गजानन पालयेकर, प्रकाश कवठणकर, पुनाजी राऊळ, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, राघोबा सावंत, लाडोबा केरकर, स्वप्निल नाईक, रोहिणी गावडे, श्वेता कोरगावकर, गौरी आरोंदेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सावंतवाडी तालुका हागणदारीमुक्त झाल्यानिमित्त सावंतवाडी शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने चित्ररथ सहभागी झाले होते. या रॅलीचे विसर्जन बॅ. नाथ पै सभागृहात पार पडल्यानंतर तेथे लोकोत्सव पार पडला. यावेळी अध्यक्ष संदेश सावंत व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना गौरविण्यात आले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच आता यापुढे हागणदारीमुक्त जिल्हा यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली असून, एकत्रितपणे प्रयत्न करून हागणदारीमुक्त जिल्हा केला तसा तो यापुढे टिकवा, असे आव्हान त्यांनी केले. संदेश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला याची साक्ष जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मिळत आहे. सिंधुदुर्गचा महाराष्ट्रातही गौरव झाला असून, हा गौरव टिकवण्याचे काम प्रत्येक तालुक्याचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला तसा तो प्लास्टिकमुक्त करूया, असे आव्हानही यावेळी सावंत यांनी केले. लोकोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, ओवळिये सरपंच गजानन सावंत, माडखोल सरपंच अनिता राऊळ, उपाध्यक्ष रणजित देसाई आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेडणेकर यांनी केले. तालुक्यातून अनेक ग्रामपंचायतीनी खास चित्ररथ तयार केले होते. त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी) शिवसेनेच्या गटनेत्याच्या भाषणावर गदा सावंतवाडी पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता असून लोकोत्सवाच्या कार्यक्रमावर पूर्णपणे काँग्रेसचाच प्रभाव असल्याचे दिसून येत होते. शिवसेनेला व्यासपीठावर बसवले; मात्र एकाही सदस्याला बोलण्यास देण्यात आले नाही. शिवसेनेचे गटनेते अशोक दळवी यांचे भाषणासाठी नाव घेतले. मात्र, सभापतींनी त्यांना तेथेच थांबवत प्रमोद कामत यांना भाषण करण्यास सांगितले. यावेळी दळवींची नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत होती.
हागणदारी मुक्तीनंतर जिल्हा प्लास्टिकमुक्ती
By admin | Published: October 18, 2015 12:03 AM