सावंतवाडी : शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली. सावंतवाडीत भाजप कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांकडून रामदास कदम यांचा निषेध करत पुतळा जाळला.सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात केलेली खालच्या पातळीवरील टीका आम्ही कदापी सहन करून घेणार नाही. रामदास कदमांनी त्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घरी बसवू असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला. तसेच यांचे मंत्री दीपक केसरकर यांनी ही भान ठेवावे असाही इशारा दिला.दरम्यान, जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाहीत तोवर महायुतीत शिवसेनेसोबत बसणार नाही. आगामी निवडणुकांत सहकार्य करणार नाही, बहिष्कार घालू असा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी जोडे मारत निषेध नोंदविला. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, साक्षी गवस, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, मकरंद तोरसकर, परिक्षित मांजरेकर, हेमंत बांदेकर, अनिकेत आसोलकर, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत आदी उपस्थित होते.
रामदास कदम-रविंद्र चव्हाण वाद; भाजप कार्यकर्ते आक्रमक, सावंतवाडीत रामदास कदमांचा पुतळा जाळला
By अनंत खं.जाधव | Published: August 20, 2024 5:08 PM