सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष ईशाद शेख यांना तडकाफडकी हटवून समीर वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली खरी मात्र आता हीच नियुक्ती वादात सापडली. यानंतर जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्यानंतर प्रदेश काँग्रेसने वंजारी यांच्या निवडीलाच स्थगिती दिली असून ईशाद शेख यांना जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नेमले आहे. याबाबतचे पत्र शुक्रवारी पाठविण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी ईशाद शेख यांची नेमणूक दीड वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र दोन दिवसापूर्वीच शेख यांना तडकाफडकी बदलून त्याच्या जागी समीर वंजारी यांची नेमणूक करण्यात आली. मात्र वंजारी यांची नियुक्ती वादात सापडली. पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही, असा आरोप करीत जेष्ठ नेते विकास सावंत यांच्यासह तालुकाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले सामुदायिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिले.तसेच प्रसिद्धी पत्रक देत वंजारी यांची नियुक्ती मान्य नसल्याचे सांगून चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदाच्या बाबत जो निर्णय घेण्यात आला, तसा निर्णय या ठिकाणी घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली तसे पत्र तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले आहे. शेख यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणूका पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी शंशाक बावचकर यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र या ठरावाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांना किंमत दिली जात नसेल तर आम्ही सामुहिक राजीनामे देत असल्याचे म्हणत राजीनामा पत्रावर सहया केल्या आहेत.यात प्रदेश प्रतिनिधी विकास सावंत, हीरोजी परब, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मेघनाद धुरी, महेंद्र सांगेलकर, प्रदिप मांजरेकर, वासुदेव नाईक, दालमिया पाटणकर, विजय प्रभू, किरण टेंबूलकर, नागेश मोर्ये, उत्तम चव्हाण, प्रविण वसनकर, उमेश कुलकर्णी, सिध्देश परब, कृष्णा धाऊसकर, सुभाष दळवी, केतन गावडे, आनंद परुळेकर, जगन्नाथ बोंद्रे, राघवेंद्र नार्वेकर, अफरीन करोल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या.दरम्यान पदाधिकाऱ्यांकडून सामुदायिक राजीनामास्त्रा नंतर प्रदेश काँग्रेसकडून यांची गंभीर दखल घेत समीर वंजारी याच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाला स्थगिती देत ईशाद शेख यांचीच नियुक्ती कायम ठेवली आहे. याबाबतचे पत्र शुकवारी प्राप्त झाले आहे. यापत्रानंतर मात्र अद्याप पर्यत कोणीही प्रतिकिया दिली नाही.
पदाधिकाऱ्यांच्या राजीनामास्त्रानंतर प्रदेश काँग्रेस नरमले, समीर वंजारी यांच्या नियुक्तीला स्थगिती
By अनंत खं.जाधव | Published: September 29, 2023 6:49 PM