कणकवली : रत्नागिरीतील खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेनेच्यावतीनेही मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि.११) दुपारी ३ वाजता रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथे नवनियुक्त रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पक्षाच्या नवीन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर रवींद्र फाटक येत आहेत. तसेच या मेळाव्याला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांच्या या मेळाव्यात नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार तसेच काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही होणार आहे. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केले आहे.
ठाकरेंच्या सभेनंतर कोकणात शिवसेनेचा मेळावा, कधी अन् कुठे... जाणून घ्या
By सुधीर राणे | Published: March 09, 2023 4:31 PM