कणकवली : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात कणकवली येथील पेट्रोलपंपासमोर कणकवली तालुका कॉंग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुका सरचिटणीस प्रवीण वरुणकर, निलेश मालंडकर, प्रदीप तळगावकर, पंढरी पांगम, संदीप कदम, संतोष तेली, प्रदीपकुमार जाधव, परेश एकावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले. ते म्हणाले, मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती. ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये आहे म्हणजे ८२० टक्के वाढ आहे. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लूटमार केली आहे. तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षांच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये तो १८ रुपये प्रतिलिटर केला.सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रुपये सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रती लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो. या विरोधात जनतेचे लक्ष वेधण्यासाठी निषेध आंदोलन करीत असल्याचे मांजरेकर म्हणाले.
केंद्रात मनमोहनसिंग सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११० डॉलर प्रती बॅरल असताना देशांतर्गत किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६४ डॉलर प्रती बॅरल एवढी कमी असतानाही पेट्रोल व डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. कोरोना साथ ओसरल्यावर यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.