सिंधुदुर्गनगरी : वाळु वाहतुकीसंदर्भात आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता. आता या युती सरकारच्या काळात लाखो रूपयांचा दंड आकारण्यात येत असून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज होणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आंदोलनकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे, असा इशारा काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेटी दरम्यान चर्चा करताना दिला दिला. नाकात बोलण्यापेक्षा ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर चालक-मालक व्यावसायिकांचे तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच असून या आंदोलनस्थळी दुपारी ३ वाजता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा करीत प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली.यावेळी आंदोलनकर्ते संजय पडते व इतरांनी राणे यांना प्रशासन मोठ्या प्रमाणात वाळू व डंपर व्यावसायिकांना त्रास देत असून मोठ्या प्रमाणात दंडाची आकारणी, तसेच डंपर जप्त करीत असून अगोदरच कर्जबाजारी असलेल्या डंपर व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम हे प्रशासन करीत आहे असे सांगितले.यावर बोलताना राणे म्हणाले की, आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता तसेच किमान व कमाल अशी दंड आकारणीवर मर्यादा होती. म्हणजे तीन पटाच्या वरती दंड आकारणी करण्यात येत नव्हती. आता या सरकारने तीनऐवजी पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदार कोण आहे ते तुम्हीच ठरवा. सत्ताधारी आमदाराला पोलीस लाठीमार करतात, येथील जनतेला लाठीमार होतो, जिल्हाधिकारी तुम्हाला भेट देत नाही तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. या सर्व आजच्या स्थितीला सत्ताधिकारी, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असे त्यांनी सांगितले. काही जण मार खाऊन मुंबईला गेले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेत आयुक्तांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे हा प्रश्न सुटणार आहे का? ते नेमके काय करतात हेच नेमके समजत नाही असाही टोला त्यांनी येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लगावला. तर भाजपचे पदाधिकारी माधव भंडारी यांनी काँग्रेसने गुंड आणल्याचे सांगितले. हे त्यांचे विधान चुकीचे असून आम्ही जनतेला न्याय मिळण्यासाठी लढतच राहणार आहोत. मी पालकमंत्री असताना ही परिस्थिती या जिल्ह्यात नव्हती. येथील प्रशासनावर वचक होती मात्र आताच्या या सत्ताधिकारी लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी ऐकत नाही. या प्रश्नासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून यावर योग्य तो निर्णय घ्यायला लावणार आहे. येथे सुरू असलेल्या आंदोलनात मी पक्षीय राजकारण आणणार नाही. हे व्यावसायिक माझ्या जिल्ह्यातील असून त्यांच्यावर लाठीचार्ज केला, रक्त काढले. त्यामुळे माझ्या या जनतेला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.(प्रतिनिधी)राणेंचा टोला : नाकात बोलणारा पालकमंत्री नकोसध्याचे पालकमंत्री हे नाकात बोलणारे असून काही कामाचे नाहीत, अशी टीका पालकमंत्र्यांवर करीत आम्हाला नाकात बोलणारा पालकमंत्री नको. ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही नारायण राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार
By admin | Published: March 06, 2016 11:13 PM