कणकवली : सैन्यदलात १५ वर्षे सेवा बजावून ३३ व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाला दहा - दहा वर्षे नोकरीसाठी वणवण करावी लागते. नव्या ' अग्निपथ ' योजनेत चार वर्षात सैनिकांना सेवानिवृत्त केल्यास बेकारांची फौज उभी राहील. सैन्यात अर्धवट नोकरी केलेल्या या मुलांमध्ये प्रचंड नैराश्य येईल आणि ते धोकादायक असणार आहे असे मत माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सावंत म्हणाले, युद्धाच्या मैदानात लढण्यासाठी जी प्रेरणा कौशल्य, संघर्ष, शक्ती लागते ती चार वर्षात तयार होवू शकत नाही. याचा सैन्य दलावर मोठा परिणाम होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकारने 'अग्निपथ' योजनेचा पुनर्विचार करायला हवा. याबाबत सैनिक फेडरेशनतर्फे ठराव घेऊन पंतप्रधानांना पत्र पाठविले जाणार आहे. त्याची दखल न घेतल्यास आंदोलनाशिवाय आमच्या जवळ दुसरा पर्याय राहणार नाही.'अग्निपथ' मागे राजकीय षड्यंत्र'अग्निपथ ' हा एक नवीन प्रयोग सुरू झाला आहे . याच्या पाठीमागे राजकीय षड्यंत्र काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे . सैन्यात शिपाई झाल्यानंतर त्यांचे दुधाचे दात पडण्यासाठी ४ वर्ष लागतात. मग तो कुठेतरी योद्धा होतो आणि ७-८ वर्षामध्ये युद्ध कौशल्यात पारंगत होतो. सैन्य म्हणजे काही नोकरी धंद्याचे ठिकाण नव्हे आणि सरकारने सुद्धा सैन्याला नोकरी देण्याचे ठिकाण बनवू नये . कुठलाही सैनिक पैशासाठी लढत नाही, तो मातृभूमीसाठी लढतो. त्याला राष्ट्रप्रेमी सैनिक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते. त्याला एक काळ लागतो. वर्षांमध्ये कुणीही पूर्ण सैनिक बनू शकत नाही...मग सैनिकांना निर्दयीपणे का वागवले जाते?१५ वर्ष सैन्यात वापरून घेतात आणि नंतर त्यांना रस्त्यावर फेकून देतात. मग निवृत्त सैनिक नोकरीसाठी दरदर भटकतो. त्यामुळे निवृत्त सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इतर सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना ५८ वर्षापर्यंत नोकरीची हमी आहे. मग सैनिकांना असे निर्दयीपणे का वागवले जाते. शासकीय नोकरीत घेण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्यांना पहिली तीन वर्षे सैन्य दलात नोकरी करण्याची सक्ती करावी. जेणेकरून सरकारी नोकरीत फौज तयार होईल, कामात शिस्त येईल , अशी मागणी आपण यापूर्वीच केल्याचे सावंत म्हणाले.पेन्शन कमी करण्यासाठी 'अग्निपथ'चा अट्टहाससैन्याची पुर्नरचना करताना सैन्य कमकुवत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ४ वर्षे सैन्यात घेऊन, नंतर त्यांना काढून टाकणे चुकीचे आहे. सैन्याला वाचवा म्हणून आपल्याला दररोज मेसेज येत आहेत. केवळ पेन्शन कमी करण्यासाठी अग्निपथ'चा अट्टहास नको , असेही सुधीर सावंत यावेळी म्हणाले.
'अग्निपथ' मधून बेकारांची फौज तयार होईल!, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंतांनी व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 5:50 PM