रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महावितरणकडे ११९८ शेतीपंपांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. जानेवारीमध्ये ४९८ शेतीपंप कनेक्शन देण्यात आली आहेत. वर्षभरात प्रलंबित पंपांना वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी दिली.जिल्ह्यात एकूण १६ हजार कृषीपंप आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी कृषीपंप वाढवण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार ३००० नवीन कृषीपंप कनेक्शन देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ज्याठिकाणी पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. तेथे कृषीपंप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.जिल्ह्यात १७ उपविभाग असून, दरमहा प्रत्येक विभागाला दहा मिळून जिल्ह्यात दरमहा ३५० ते ४०० कृषीपंप कनेक्शन देण्यात येणार आहेत. वर्षभरात प्रलंबित वीज प्रस्तावही पूर्ण करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसला आहे. फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात कलमबाग लागवडीला चालना मिळाली आहे. डोंगरउतारावर बागायती लागवड करण्यात आली आहे. डोंगरउतारावरील या बागायतींसाठी पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी शासकीय अनुदान देण्यात येते. परंतु, डोंगरातील, कातळावरील वीज कनेक्शन देण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नव्हते. परिणामी वीज कनेक्शन देण्यास उशीर होत होता. कातळ फोडण्यासाठीही खूप अवधी लागायचा, तसेच खर्चिक बाबीमुळे ठेकेदारांचा प्रतिसादही अल्प होता. त्यामुळे ही वीज कनेक्शन प्रलंबित राहिली होती. मात्र, ऊर्जामंत्री यांनी कृषीपंप कनेक्शन वाढवण्यासाठी हिरवा कंदील दिल्यामुळे प्रलंबित कनेक्शन महावितरणकडून प्राधान्याने देण्यात येणार आहेत. तसेच नवीन कनेक्शनसाठीही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मागणीत वाढ : पावसाचे प्रमाण कमीरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने नदीवर किंवा ओढ्यावर कृषीपंप लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. महावितरणकडून कृषीपंपासाठी सवलत मिळत असल्याने कृषीपंपाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे कृषीपंपाची संख्या वाढत आहे.थकबाकी कमीरत्नागिरी जिल्ह्यात महावितरणच्या थकबाकीचे प्रमाण खूपच कमी आहे. याठिकाणी वसुलीचेही प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे.
शेतीपंपाचे ११९८ प्रस्ताव प्रलंबित
By admin | Published: February 07, 2016 11:59 PM