कणकवली : कोल्हापूर ते वेंगुर्ले हे अंतर कमी करणाऱ्या आंजीवडे घाट रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी माणगाव खोऱ्याबरोबरच सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने महसूल तथा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही केली होती. या अनुषंगाने केलेला सर्व्हेचा प्रस्ताव वनखात्याकडून महसूलमंत्र्यांनी तातडीने मागविला आहे. त्यामुळे या घाट रस्त्याचे काम दृष्टिक्षेपात आले असल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी दिली.कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बंड्या सावंत उपस्थित होते. अतुल काळसेकर म्हणाले, कुडाळ तहसीलमधील आंजीवडे गवळीवाडी भैरीची पाणंद ते धुरिवाडी पाटगाव गारगोटी कोल्हापूर हा रस्ता ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून वेंगुर्ले, कुडाळ बाजारपेठेत मालवाहतूक याच रस्त्याने केली जात होती. हा रस्ता वसोली ग्रामपंचायतीच्या 26 नंबरला लागलेला असून, रस्त्याचे नूतनीकरण झाल्यास सिंधुदुर्ग ते कोल्हापूर हे अंतर 40 किलोमीटरने कमी होणार आहे.या मार्गावरील फक्त 6 किलोमीटरचा रस्ता करायचा आहे. आंजीवडे ग्रामस्थांनी 1 किलोमीटरचा रस्ता श्रमदानाने तयार केलेला आहे. तर पाटगावच्या हद्दीत येणारा 1 किलोमीटरचा रस्ता तेथील ग्रामस्थ श्रमदानाने करायला तयार आहेत. त्यामुळे चार किलोमीटर रस्ता तयार करायचा असून, रस्त्याला चढ उतार किंवा वळणे नसून रस्ता सपाट आहे. या रस्त्यासाठी वनखात्याची 40 गुंठे जागा लागण्याची शक्यता आहे.12 मे 2003 व 31 ऑक्टोबर 2006 च्या शासन निर्णयानुसार जुना रस्ता नूतनीकरणास वनविभागाची अडचण नाही. हा रस्ता झाल्यास पाटगाव ते गारगोटी अंतर 30 किलोमीटर व गारगोटी ते कोल्हापूर अंतर 45 किलोमीटर व आंजीवडे ते वेंगुर्ले अंतर 40 किलोमीटर असे 115 किलोमीटर होणार आहे. आंबोली , फोंडाघाट, गगनबावडा घाटातून हे अंतर 160 किलोमीटर पेक्षा जास्त होते. तसेच हे तिन्ही घाट कोसळत असतात. त्यामुळे वाहतूक बंद राहते. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी आंजीवडे घाट रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मकता दाखवली असून, कामाबाबत कार्यवाही सुरू केली आहे.अतुल काळसेकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे सबलीकरण होण्याच्या दृष्टीने ' चांदा ते बांदा' या योजनेत लेअर कुक्कुटपालन व्यवसायाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. त्यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे.जिल्ह्यात लेअर कुक्कुटपालन व्यवसाय वाढीकरिता जिल्हा बँकेने चालना देऊन सर्वसामान्य महिलांना कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या व्यवसायाचा शासनाने चांदा ते बांदा या योजनेत समावेश करून बँक कर्जाच्या व्याजात सवलत मिळाल्यास महिला वर्गास त्याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्हा बँक लेअर कुक्कुटपालन योजना राबवित असून, भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. या व्यवसायाकरिता व्यंकटेश्वरा हॅचरीज यांच्यामार्फत 16 आठवड्याचे लेअर पक्षी, पिंजरे खरेदी केले जात आहेत. तसेच अंडी खरेदीची हमी, खाद्य पुरवठा हमी ट्रेडर्समार्फत घेतली जात आहे. प्रकल्पातील विक्री केलेल्या अंड्याची रक्कम दर दहा दिवसांनी महिलांचे बचत खाती जमा केली जात आहे. तसेच त्यांचे बचत खात्यातून खाद्य व बँक कर्जाचा हप्ता वजा केला जात आहे. लाभार्थी, बँक व ट्रेडर्स यांच्यामार्फत त्रिपक्षीय करार केला जातो. या व्यवसायास आणखीन चालना मिळण्यासाठी ' चांदा ते बांदा' या योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबाबतही अर्थमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.सहकारमंत्री येणार कोकण दौऱ्यावर !मजूर संस्थांना अडचणींचा विषय ठरत असलेल्या मुद्यांबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये संस्थेचे सभासद नसलेल्या मजुरांना मजुरी देताना येणाऱ्या अडचणींचा समावेश होता. 1 व 2 फेब्रुवारी या कालावधीत सहकार मंत्री कोकण दौऱ्यावर येणार आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांकडून ते या समस्याबाबत आढावा घेणार आहेत. यावेळी निश्चितपणे तोडगा निघू शकेल. तसेच मजूर सोसायट्यांना दिलासा मिळेल, असे अतुल काळसेकर यांनी सांगितले.
आंजीवडे घाट रस्त्याचे लवकरच नूतनीकरण होणार, अतुल काळसेकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 8:20 PM