आचरा : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलामार्फत सागरी सुरक्षिततेचा आढावा घेणाऱ्या सागरी सुरक्षा कवच मोहिमेंतर्गत सर्वत्र सतर्कता ठेवण्यात आली आहे. आचरा समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. सागरी सुरक्षिततेचा आढावा घेण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या सागर सुरक्षा कवच मोहिमेंतर्गत आचरा पोलीस ठाण्याला २० जादा पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस मुख्यालयामार्फत पुरविण्यात आले आहेत. आचरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, सागर सुरक्षा रक्षक, नागरिक, पोलीस पाटील, जादा पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत आचरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अतिसतर्कता पाळण्यात आली आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागातील हिर्लेवाडी, पिरावाडी, जामडुल, सापळेबाग, वायंगणी येथे पॉर्इंट करण्यात आले असून पेट्रोलिंग करीत संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे.समुद्रामध्ये बोटींची तपासणी करण्यात येत असून बेळणे चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आचरा समुद्रकिनारपट्टी भागात अचानकपणे कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास आचरा पोलिसांशी संपर्क करायचा आहे. आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, उपनिरीक्षक एस. वाळवेकर, संदीप कांबळे, हनुमंत बांगर यांनी सर्व बंदोबस्त ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. तसेच स्थानिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन केलेआहे. (वार्ताहर)
आचरा समुद्रकिनाऱ्यावर सतर्कता
By admin | Published: April 16, 2015 10:18 PM