सिंधुदुर्ग : विविध विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाकडे असणारी साधनसामग्री सुस्थितीत ठेऊन, ती सज्ज ठेवावी. विशेषतः आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसोबत पॉवर बॅकअप ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महापात्रा, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, दक्षिण कोकण पाटबंधारे महामंडळाचे अधिक्षक अभियंता विजयकुमार थोरात, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, सिंधुदुर्ग प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी.व्ही.अजगावकर, मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबडपालचे कार्यकारी अभियंता हर्षल यादव, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी विविध विभागांकडून आढावा घेतला. त्या म्हणाल्या, तौक्ते वादळाच्या अनुषंगाने आपणासर्वांची तयारी झाली असली तरी, त्यामध्ये सतर्कता हवीच. पाटबंधारे विभागाने तिलारी प्रकल्पातील पाण्याबाबत सनियंत्रण करावे.
पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी त्याबाबतची पूर्वसूचना देण्याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद झाल्यास तो तात्काळ पूर्ववत करण्यासाठी साधनसामग्री तैनात ठेवावी. सर्वच विभागांकडे असणारी साधनसामग्री ही तयार असावी. त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने कोविड बरोबरच लेप्टो तसेच सर्पदंश यासारख्या घटनांबाबत आवश्यक तो औषधसाठा ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य विभागाने पॉवर बॅकअप ही ठेवायला हवा.तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावर बैठक घ्यावी. संभाव्य निवारा केंद्रांसाठी ठिकाणे शोधावीत, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाल्या, निवारा केंद्राच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. आवश्यक सुविधा तयार हव्यात.
आवश्यक त्या ठिकाणी टॅँकर्सचे नियोजन असायला हवे. टीसीएलचा वापर करावा, सीओडी, बिओडीची तपासणी करुन घ्यावी. धोकादायक इमारतींबाबत स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, यावर लक्ष देऊन मुख्याधिकारी यांनी त्याबाबत उपाययोजना कराव्यात. नाला सफाईचे कामही हाती घ्यावे.पोलीस अधिक्षक दाभाडे म्हणाले, पोलीस अधिकारी आणि तहसिलदार यांनी संपर्कात रहावे. आपल्या जवळील असणारे साहित्य प्रत्यक्ष कार्यशील असल्याबाबत खात्री करावी. बोटी ने आण करण्यासाठी वाहनाची सोय असावी. त्याबाबतची अद्ययावत यादी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने द्यावी. पोलीसांकडिल असणारी वायरलेस यंत्रणा आपत्ती काळात संदेश प्रणालीसाठी उपयुक्त ठरेल. त्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी रहावे.महावितरणचे अधिक्षक अभियंता पाटील तसेच पाटबंधारे विभागाचे कार्याकारी अभियंता अजगावकर यांनीही यावेळी नियोजनाबाबत माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी यावेळी सर्वांचे स्वागत, प्रास्ताविक करून विभागनिहाय नियोजनाबाबत वाचन केले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, बीएसएनएलचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम आदींनी सहभाग घेतला.