कणकवली : सत्ताधारी व विरोधक आरोग्य, रस्ते व अन्य मुद्यांवरून एकमेकांवर आरोप करीत आहेत. भाजपवाले सत्तेत असताना स्वत: काही करू शकले नाहीत. सत्ता गेल्यानंतर आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.गेल्या २५ वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चार पक्षांचे सरकार होते. पाटबंधारे, मच्छिमार, रस्ते, आरोग्य प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, शिवसेना आता सत्तेत असताना शिवसेना कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करताहेत. गेल्या वर्षी शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी अशोक दळवी रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा करीत आहेत. तर मालवण शहरप्रमुख पॅकेजमधून गस्ती नौका घ्याव्यात असे सांगत आहेत. माजी पालकमंत्र्यांनी गस्तीनौका आल्याची घोषणा करीत सत्कार करून घेतला होता.सत्ताधारी रुग्णालयाच्या बाबतीत राजकारण करताहेत. त्यांना कुडाळचे महिला रुग्णालय सुरू करता येत नाही. मी आमदार असताना छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला १ कोटी देण्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी आदेश दिले होते. मात्र, ते पैसे अद्यापही खर्च करता आले नाहीत.गुंठ्याला १०० रुपये म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाचसत्तेतील व विरोधी पक्षात बसलेले आरोग्य, रस्ते, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी असफल ठरले आहेत. सरकारने हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केले. गुंठ्याला १०० रुपये मिळतील. ही शेतकऱ्यांची चेष्टाच आहे. या विरोधात मनसे आंदोलन करणार आहे. सताधारी शिवसेना सहा वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात मोर्चा आंदोलने करीत होती. मात्र, स्वतः ६ वर्षांच्या सत्तेच्या काळात प्रश्न सोडवू शकले नाहीत.
घरबांधणी परवानगी ग्रामपंचायतींना दिल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगत मंत्र्यांचा सत्कार केला. मात्र, अद्याप ग्रामपंचायतींना परवानगीचे अधिकार नाहीत, ही जनतेची फसवणूक आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.