मालवण : मालवण नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपचे केवळ पाच उमेदवार वगळता एकाही राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. शिवसेना अद्यापही युतीबाबत ‘तळ्यात-मळ्यात’ आहे, तर काँग्रेसकडून उमेदवारांच्या मेगा मुलाखती घेऊन दोन दिवस उलटले तरी उमेदवारी जाहीर झालेली नाही. काँग्रेसच्या गोटातून नगराध्यक्षसह नगरसेवक पदाचे नवे चेहरे समोर येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. त्यामुळे जुन्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने बंडखोरी होणार असल्याचे चित्र आहे. बंडखोरी केलेले उमेदवार स्वतंत्र आघाडी करून लढण्याचीही चर्चा रंगू लागली आहे. सर्वच् पक्षाकडून पडद्याआड चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. बुधवारी भाजपकडून एकतर्फी युतीची घोषणा करीत आठ जागांवर दावा करताना पाचजागांचे उमेदवार पहिल्या टप्प्यात जाहीर केले आहेत, तर उर्वरित प्रभागात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी देण्याबाबत डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातील नाराज इच्छुक उमेदवार वेगळी आघाडी स्थापन करण्याच्या मानसिकतेत आहेत. शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष ४शिवसेनेने युतीबाबतचे मौन धरले असून, आमदार वैभव नाईक हे स्वत: लक्ष घालून जोरदार नियोजन करीत आहेत. गुरुवारी सायंकाळी पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही युतीचा सूर दिसला नाही. ४त्यामुळे भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. तर शिवसेनेकडून इच्छुक अपक्ष उमेदवारांची मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे. युवा मच्छिमारांनी आघाडी करून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली असून, याबाबतही शुक्रवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.
मालवणात सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण
By admin | Published: October 28, 2016 11:01 PM