कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक या शिवसेनेच्या तिन्ही पदाधिका-यांनी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली.पडवे (ता. कुडाळ ) येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी तिघांवरही निशाणा साधला. पालकमंत्री नको ते धंदे करीत सुटले आहेत. या तिघांचेही काम काय ते त्यांनी सांगावे आणि नंतर मते मागावीत, असेही राणे म्हणाले. गेल्या तीन वर्षात रेशनिंगवर धान्य नाही. रॉकेल मिळत नाही. सी-वर्ल्ड, विमानतळाचे काम रखडले आहे. आयटी पार्क, दोडामार्ग एमआयडीसी या महत्त्वाच्या कामांबरोबच जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधा यांची कामे मी केली होती. पण आता कोणतेच काम मार्गी लागलेले नाही.राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांना हे खड्डे बुजविता आले नाहीत. ते जास्त वेळ गोव्यात असतात. हे असेच चालू राहिले तर पालकमंत्र्यांचे सर्व कारनामे उघड करीन, असा इशाराही राणे यांनी दिला.खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका करताना राणे म्हणाले, राऊत यांची १३ प्रकरणे मी बाहेर काढीन. त्यांना सभागृहात बोलताही येत नाही. कुठे काय बोलावे, काय करावे तेही कळत नाही. खासदारांनी जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. राणेंची जास्त बदनामी केल्यास पार्ल्याचा इतिहास सांगावा लागेल.
शिवसेनेच्या तिन्ही पदाधिका-यांनी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ - नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:40 PM