देवगड : तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून पुढची २५ वर्षे देवगडला विकासात कसे पुढे नेता येईल यासाठी दिशा ठरविणार आहे. समाजकारण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी देवगड तालुक्याच्या आमसभेत केले. शुक्रवारी येथील इंद्रप्रस्थ सभागृहात देवगड तालुक्याची आमसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सभापती डॉ. मनोज सारंग, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, माजी आमदार अजित गोगटे, तहसीलदार जीवन कांबळे, सदाशिव ओगले, प्रणाली माने आदी मान्यवर उपस्थित होते. आमसभेच्या सुरुवातीला देवगडच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या व गेल्या वर्षभरात निधन पावलेल्यांची आठवण करण्यात आली.आमदार राणे पुढे म्हणाले की, देवगड-जामसंडे पाणीप्रश्नावर राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे. तिलारीप्रमाणे देवगडात योजना राबविण्याचा प्रयत्न झाल्यास आपला त्याला विरोधच असेल. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. पडेल कॅन्टींग येथील सर्कल वाहतूकदृष्ट्या अडचणीचे असल्याने त्याचे काम स्थगित करण्यात येईल. देवगड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खेळांच्या स्पर्धांमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या खर्चाबाबत प्रस्ताव मांडण्यात आला.आनंदवाडी प्रकल्पासह इतर प्रश्नांबाबत लेखी निवेदने देण्यास सांगण्यात आले. आंबा बागायतदारांप्रमाणेच मत्स्य व्यावसायिकांनाही क्रेट देण्याची मागणी शिवाजी कांदळगावकर यांनी केली. माजी आमदार गोगटे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत होण्यासंदर्भात मुद्दा मांडला. आमसभेला उपस्थित नसलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्याबद्दल आमदार राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार राणे म्हणाले की, देवगडला मागासलेला तालुका असे म्हटले जाते. आता ही प्रतिमा बदलून देवगडला विकसनशील व पुरोगामी तालुका असे म्हटले जाईल. तालुक्याच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. या आधीच्या लोकप्रतिनिधींनी आपल्यापरीने विकास केला. तशाच प्रकारे विकास करताना लोकांनी दिलेली संधी योग्य रितीने पार पाडली जाईल. (वार्ताहर)विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कारसभेदरम्यान पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक, आदर्श ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला. देवगड पंचायत समितीने पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळविल्याने तसेच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केल्याने गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
समाजकारणासाठी सर्वांनी एकत्र यावे
By admin | Published: February 20, 2015 10:24 PM