कणकवली : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय आशा वर्कर्स व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य कार्यकारिणीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिघांचा समावेश झाला आहे. यामध्ये सहसचिवपदी विजयाराणी पाटील, उपाध्यक्षपदी सुभाष निकम तसेच राज्य समितीवर सदस्य म्हणून अर्चना धुरी यांचा समावेश आहे. या राज्यस्तरीय समितीत इतर जिल्ह्यांतील २१ आशा सदस्यांची सर्वानुमते निवड झाली आहे. अध्यक्षपदी विजय गाभणे (नांदेड), सचिवपदी नेत्रदीपा पाटील (कोल्हापूर), तर खजिनदारपदी वृंदा कांबळे (पुणे) यांची निवड झाली .महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील आशा व गटप्रवर्तक यांच्या सीटू संलग्न आशा वर्कर्स संघटनांनी राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स व गटप्रवर्तक फेडरेशनची स्थापना कोल्हापूरमध्ये झालेल्या पहिल्या राज्य अधिवेशनात केली होती. विजयाराणी पाटील या २०१२ पासून सीटूसंलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या सचिवपदी कार्यरत असून, तीन वर्षांत त्यांनी युनियनला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो आशा कार्यकर्त्यांना संघटित करून जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आझाद मैदान मुंबई येथे विविध आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. अर्चना धुरी याही २०१२ पासून सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्षा म्हणून काम करीत आहेत. आशा स्वयंसेविका म्हणून आशा वर्कर्स युनियन जिल्ह्यात मजबूत करून जिल्ह्यातील आशांना व गटप्रवर्तकांना मानधन मिळवून द्यायचेच या निर्धाराने त्यादेखील खंबीरपणे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही उत्कृष्ट सामाजिक काम केले आहे. विजयाराणी पाटील व अर्चना धुरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्य फेडरेशनवर निवड झाल्याने जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी दोघींचेही अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्य समितीमध्ये त्या आपल्या संघटन कौशल्याचा वापर करून आशा व गटप्रवर्तकांना त्यांचे अधिकार, हक्क व न्याय मिळवून देतील, अशी खात्रीही व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा अर्चना धुरी, सचिव विजयाराणी पाटील, खजिनदार सुनीता पवार, सदस्य विशाखा पाटील, ज्योती सावंत, राजश्री नाईक, सुमिता गवस, मनाली इलावडेकर, लक्ष्मी राऊळ व सर्व पीएचसी युनिट प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय आशा-गटप्रवर्तक फेडरेशनमध्ये जिल्ह्यातील तिघे
By admin | Published: January 19, 2015 9:23 PM