कुडाळ : आय.आर.बी. इन्फ्राने विकसित केलेल्या सिंधुदुर्ग, चिपी विमानतळावरून १ फेब्रुवारी पासून आता दुसरे विमान उड्डाण करणार आहे. मुंबई सिंधुदुर्ग- मुंबई ही विमानसेवा देणाऱ्या अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैद्राबाद म्हैसूर- सिंधुदुर्ग - म्हैसूर - हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. सुरवातीला दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या सेवेच्या प्रारंभाने सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैद्राबाद आणि दक्षिणेस म्हैसूर या देशातील अत्यंत महत्वाच्या शहरांशी विमानसेवेने जोडला जाणार आहे. अशी माहिती आयआरबी कंपनीच्या प्रसिध्दी विभागातून देण्यात आली. विमान कंपनी मार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, विमान दर बुधवारी हैद्राबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी ६ वाजता म्हैसूर मार्गे हैद्राबाद करीता उड्डाण करेल. तर दर रविवारी हैद्राबाद वरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी ६.३० वाजता म्हैसूर मार्गे हैद्राबाद करीता उड्डाण करेल.
कोकणातल्या प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने करण्यात येत आहे. सध्या अलायन्स एअर ची सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस उपलब्ध आहे.