मालवण : मालवण पालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी तहसील कार्यालयात दिसून आली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रांताधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदासाठी तीन आणि नगरसेवक पदासाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांचीच मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेकडून शिक्कामोर्तब झालेले महेश कांदळगावकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच कॉँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व अपक्ष म्हणून सुधाकर पंतवालावलकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना-भाजप तडजोडीनंतर अखेर युती झाली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. भाजप आठ तर शिवसेना नऊ जागांवर निवडणूक लढविणार असून शिवसेनेने सात जागांची यादीही जाहीर केली आहे. यात प्रभाग १ - पूजा जोगी, प्रभाग ३ - महेंद्र्र म्हाडगुत, सुनिता जाधव, प्रभाग ६ - आकांक्षा शिरपुटे, प्रभाग ८ - पंकज साधये, सेजल परब, तृप्ती मयेकर या उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित दोन जागांवरील उमेदवारी शनिवारी जाहीर होणार असून त्याचवेळी उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार, असेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसोबत भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या उपस्थितीत सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांपैकी पूजा करलकर (प्रभाग ७), पूजा सरकारे (प्रभाग ५), चेतन मोंडकर (प्रभाग १) या तिघांनी अर्ज सादर केला आहे. तर पक्षाने उर्वरित उमेदवार जाहीर केले नसतानाही सुनील मोंडकर (प्रभाग ७), गणेश कुशे, संदीप शिरोडकर (प्रभाग ४) यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी प्रभाकर सावंत, विलास हडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, महेश मांजरेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. सुदेश आचरेकरांचा अर्ज दाखल माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तसेच नगरसेविका स्नेहा सुदेश आचरेकर यांनी नगरसेवक पदासाठी प्रभाग ५ मधून काँग्रेसच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म अद्याप प्राप्त झाले नसल्याने अन्य काँग्रेस उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने स्वबळाची तयारी केली असून पहिल्या टप्प्यात ११ जागांची उमेदवार यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत सुदेश आचरेकर यांचे नाव नसल्याने त्यांच्या प्रभाग ५ बाबत चर्चा करून शनिवारी सकाळी यादी जाहीर होईल, असे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) शिवसेनेत उत्साह : जोरदार शक्तीप्रदर्शन शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश कांदळगावकर यांचे तहसील कार्यालयात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकाकडून आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी तसेच जोरदार घोषणाबाजीने कार्यकर्त्यांत उत्साह पसरला होता. महेश कांदळगावकर यांचा शक्तीप्रदर्शनासह दाखल केलेला उमेदवारी अर्ज पाचव्या दिवशी आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात उमेदवार, त्यांचे सूचक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, हरी खोबरेकर, शिवसेना निवडणूक प्रमुख नितीन वाळके, शहर प्रमुख बाबी जोगी, राजा गावकर, नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, गौरव वेर्लेकर, मेघा गावकर, महेंद्र म्हाडगुत, किसन मांजरेकर, गणेश कुडाळकर, महेश शिरपुटे आदी उपस्थित होते.
उमेदवारी दाखल करण्यात युतीचा वरचष्मा
By admin | Published: October 28, 2016 11:38 PM