सिंधुदुर्ग-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती दौऱ्यात भाजपावर जोरदार हल्ला केला. बारामतीतील इन्क्युबेशन सेंटरच्या उदघाटनावेळी उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष आम्ही देखील नको ती अंडी उबवली. त्याचं पुढं काय झालं ते तुम्ही बघत आहात, असं म्हणत भाजपावर निशाणा साधला होता. त्यावर आता माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. शिवसेना-भाजप युती उद्धव ठाकरेंनी नव्हे, तर बाळासाहेबांनी जपली होती हे आधी त्यांनी समजून घ्यावं, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
"मुख्यमंत्री काय बोलतात तेच कळत नाही. त्यांचं बोलणं समूजन घेण्यासाठी ट्रान्सलेटर लागतो. २५ वर्ष स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजपा युती जपली, उद्धव ठाकरेंनी नाही. सेनेचे भाजपावर आणि भाजपाचे सेनेवर प्रेम होते. यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकारच काय?", असा सवाल निलेश राणे यांनी केला.
"१९९५ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेराच होता. ते जंगलात फिरत होते. भाजपाशी उद्धव ठाकरे यांचा संबंधच काय? तुटलं काय आणि जुळलं काय त्यांना काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं पाहिजे. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाही. त्यामुळे ट्रेनिंग घ्या आणि नंतर बोला. मग कुणी २५ वर्ष अंडी उबवली त्यावर भाष्य करा", असंही निलेश राणे म्हणाले.
निलेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधला. "नवाब मलिकांची अवस्था पिसाळल्यासारखी झाली आहे. ते काय बोलतात त्याला काहीच अर्थ नसतो. जावयाला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरील प्रेमापोटी ते हे सारं करत आहेत. एका अधिकाऱ्याची त्यांना हकालपट्टी करायची आहे आणि ती होत नाहीय त्यामुळे रोज आरोप सुरू आहेत", असं निलेश राणे म्हणाले. नवाब मलिकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? त्यांनी न्यायालयात जाऊन पुरावे सादर करावेत आणि लढावं, असंही ते म्हणाले.