असगोली : कला ही एखाद्याच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असते. या कलेला योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले तर त्यात अधिकाधिक पारंगत होता येते. अशीच कहाणी आहे तळवली डावलवाडी येथील अमर चव्हाणची. अमर याला बालपणापासून चित्रकलेची आवड. त्याच्या या कलेला वर्गशिक्षकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अमर आज निष्णात कलाकार बनला आहे.गुहागर तालुक्यातील तळवली -डावलवाडी येथे राहणारे व न्यू इंग्लिश स्कूल, तळवली येथील शिपाई सुरेश चव्हाण यांचा मुलगा अमर याने कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनातून आपल्या कलेचा सतत चढता आलेख ठेवला आहे. सध्या अमर पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. विविध चित्रे हुबेहूब रेखाटण्यात तो पारंगत आहे. त्याच्या या कलेची दखल तळवली हायस्कूलमधील कला शिक्षक एस. बालम यांनी घेतली व त्याला अधिकाधिक प्रोत्साहन देत त्याच्यामधील कलेला चालना दिली. अमर याने वाडीतील संदीप चव्हाण, प्रदीप चव्हाण तसेच वाडीतील अन्य नातेवाईक आणि राजन चौघुले यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे आवर्जून सांगितले.अमरच्या आजपर्यंतच्या एकूण वाटचालीमध्ये व यशात वाडीतील कलाशिक्षक श्रीनाथ कुळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. कलाशिक्षक श्रीनाथ कुळे यांनी अमरला फाऊंडेशन करण्यास सुचवले. यानंतर अमरनेही मागे वळून न पाहता आपल्या कलेला चांगली उभारी दिली. अथक परिश्रमानंतर अमर आज हुबेहूब व्यक्तीरेखा रेखाटतो. व्यक्तीचित्र रेखाटण्यातही त्याचा खूपच हातखंडा आहे. त्यामुळे तो आज एक उत्तम कलाकार म्हणून नावारुपाला येऊ लागला आहे.त्याने प्रसिद्ध गायक अजय - अतुल यांची व्यक्तीरेखा हुबेहूब रेखाटून साऱ्यांचीच वाहवा मिळवली आहे. सोशल मीडियावरही अमरने रेखाटलेल्या चित्रांची वाहवा होत आहे. केवळ इथेच न थांबता अमर आजही आपल्या कलेत अधिकाधिक पारंगत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची चित्रे आता रसिकमनावर अधिराज्य गाजवत आहेत. (वार्ताहर)लहानपणापासूनच आवडअमरला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे त्याच्या हाताला चांगले वळण होते. तो एखादे चित्र अगदी मन लाऊन काढत असे. हे पाहून त्याच्या वर्गशिक्षकांनी त्याच्या या कलेला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. शिक्षकांची थाप पाठीवर पडल्याने अमरला बळ मिळाले आणि त्याने या छंदाकडे लक्ष पुरवले. आता तो कोणतेही चित्र हुबेहूब रेखाटू शकतो.
अमर चव्हाण बनलाय निष्णात कलाकार
By admin | Published: November 05, 2015 12:18 AM