आंबोली : आंबोली पूर्वीचा वस मंदिराशेजारील घाट रस्ता खचल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मध्यरात्रीच्या सुमारास हा घाट रस्ता खचल्याचे वाहनचालकांनी आंबोली पोलिसांना सांगितले. पूर्वीचा वस मंदिर परिसरात असलेल्या दहा मीटर उंच पुलाचा भागही यात कोसळला. पुलाचे चार ते पाच पाईपही दरीत कोसळले. अवजड वाहनांचे वाढते प्रमाण यास कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.रविवारी दुपारी किंवा सायंकाळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. कारण त्यावेळी याच भागात पर्यटकांची शेकडो वाहने उभी होती.गेले महिनाभर कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि अवजड वाहने यामुळे हा घाट रस्ता खचला असल्याचे निदर्र्शनास येत आहे. हा घाट रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे, त्या ठिकाणी पूर्वी रस्ता अरुंद होता. कालांतराने त्या ठिकाणी भर टाकून रस्ता वाढविण्यात आला होता. ती भर फक्तमातीची असल्याने खचली. पूर्वीचा वस मंदिर ते धबधबा परिसरात अशी अनेक धोकादायक ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी वारंवार दरड कोसळणे, रस्ता खचणे यांसारखे प्रकार होत असतात. ब्रिटिशांनी आयते आंदण दिलेला आंबोली घाट आजही समर्थपणे वाहनांचे ओझे वाहतोय.‘वर्षा पर्यटना’वर या कामाचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, याबाबतही काळजी घेण्याच्या सूचना इथल्या पर्यटन व्यावसायिकांनी केल्या आहेत. (वार्ताहर)रस्ता सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना नाहीतआंबोली घाटाच्या सुरक्षेसाठी मात्र कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. अशा प्रकारे रस्ता खचला की, ठेकेदार आणि अधिकारी मात्र मलई झोडायला पुढे सरसावतात, असा आरोप इथल्या पर्यटन व्यावसायिकांनी केला आहे. या पुलाचे काम वेळकाढू आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना देऊन स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडू, असा स्पष्ट इशारा काम सुरू करण्यापूर्वीच बांधकामच्या अधिकाऱ्यांना इथल्या ग्रामस्थांनी दिला आहे.
आंबोलीत घाट रस्ता खचला
By admin | Published: July 25, 2016 10:23 PM