सावंतवाडी : आंबोली धबधब्याला भेट देणार्या पर्यटकांकडून तिकीट आकारण्याचा निर्णय वनविभागाच्या पुढाकारातून दोन दिवसापूर्वी घेण्यात आला होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून सद्या तिकिट आकारणी केली जाणार नाही. याला खुद्द सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी यांनीही दुजोरा दिला आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाला स्थानिक राजकीय नेत्यांचा विरोध असल्यानेच हा निर्णय स्थगित ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.आंबोली येथील मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शनिवार व रविवारी हजारो पर्यटक येत असतात. या पर्यटकांकडून जर तिकिट आकारणी केल्यास आलेल्या पैशातून धबधबा परिसरात अनेक सुखसोई उपलब्ध होतील असे वनविभागाला वाटते.पण हा मुख्य धबधबा जरी पारपोली गावाच्या हद्दीत येत आहे. तर धबधब्याकडे येणारा रस्त्यावर आंबोली ग्रामपंचायतची हद्द आहे. तसेच धबधब्याचे पाणी चौकुळच्या गावाच्या हद्दीतून येत असल्याने तिकिट आकारणी नेहमीच वादात सापडली आहे.पाच वर्षापूर्वी पारपोली वनव्यवस्थापन समिती आंबोली येथील धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून तिकिट आकारणी करत होते. पण या तिकिट आकारणीला आंबोली ग्रामपंचायत कडून विरोध झाला होता. तर चौकुळ येथील ग्रामस्थांकडून ही विरोध केला होता. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय स्थगित ठेवला होता.मात्र या वर्षी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी यांनी नव्याने निर्णय घेत आंबोली धबधब्यावर येणाऱ्या १४ वर्षावरील व्यक्तीला २० रुपये तर ५ वर्षावरील मुलास १० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याची अंमलबजावणी ही शनिवार, रविवार पासून होती. मात्र या निर्णयाला उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी तात्पूरती स्थगिती दिली आहे.ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेऊ : रेड्डी आंबोली धबधब्यावर तिकिट आकारणी निर्णयाला विरोध असल्याने हा निर्णय थांबवला असून ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. घाटात वाढता कचरा ही समस्या असून यावर निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळेच येणाऱ्या पैशातून आंबोली घाटात स्वच्छता तसेच पर्यटकांना सुविधा निर्माण करण्यात येणार होत्या असे सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस.नवकीशोर रेड्डी यांनी सांगितले.
पर्यटकांना दिलासा! आंबोली धबधब्यावरील तिकिट आकारणी लांबणीवर
By अनंत खं.जाधव | Published: July 08, 2023 6:20 PM