सावंतवाडी : आंबोली घाटातील मर्डर मिस्ट्री पुन्हा एकदा समोर आली आहे. खून एकीकडे करायचा आणि मृतदेह आंबोली घाटात दरीत टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा घटनांच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. आंबोली घाटात सीसीटिव्ही बसविण्याची पोलिसांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट हा नेहमीच गुन्हेगारांना आश्रयस्थान वाटत आला आहे. या घाटात रात्रीच्या वेळी वाहनांची रहदारी तसेच ये-जा करणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने गुन्हेगारीसाठी आंबोली घाटाचा वापर सर्रास होत असतो. हे मागील चार घटनांवरून समोर आले आहे.गडहिंग्लज येथील शिक्षकाला पत्नी व तिच्या प्रियकराने मारून आंबोली कावळेसाद येथे टाकले होते. सांगली येथील संशयित आरोपी अनिकेत कोथळे याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याचा मृतदेह आंबोली महादेव गड पाँइंट येथे आणून जाळण्यात आला होता. तर सावंतवाडी शहरातील मळगावमधील महिलेचा मृतदेह आंबोली घाटात टाकण्यात आला होता. तर दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याचा कऱ्हाड येथे खून करून मृतदेह आंबोली घाटात टाकत असताना खून करणाऱ्या भाऊसो माने हा संशयित पाय घसरून दरीत कोसळल्याने मृत पावल्याची घटना घडली. मागील चार वर्षांत या चार घटना घडल्या असून, या सर्व घटनांनी आंबोलीची ओळख मर्डर मिस्ट्री म्हणून बनत चालली आहे.आंबोली येथे अद्ययावत असे पोलिस ठाणे करण्यात येणार होते; पण त्याचा कुठेच पत्ता नाही. तर तत्कालीन पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आंबोली घाटात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पण, प्रत्यक्षात सर्वच घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. आंबोलीची ओळख ही संपूर्ण राज्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे; पण अलीकडच्या काळात सतत घडणारे गुन्हेगारीचे प्रकार आंबोलीच्या पर्यटनावर परिणाम करू लागले आहेत. याला आळा घालणे काळाची गरज आहे.पोलिसांच्या नाकाखालून मृतदेह घाटातपंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे यांना कऱ्हाड येथे आणून भाऊसाहेब माने व तुषार पवार यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ३० जानेवारीला सकाळी कऱ्हाड येथून खिल्लारे यांचा मृतदेह घेऊन आंबोलीच्या दिशेने निघाले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आंबोली पोलिस दुरक्षेत्रावरून ही कार घाटाच्या दिशेने आली, मात्र पोलिसांनी संशयित कारची कुठलीही तपासणी केली नाही.
आंबोली घाट बनतोय मर्डर मिस्ट्री, गुन्हेगारीसाठी सर्रास वापर; सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा हवेतच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 12:21 PM