महादेव भिसेआंबोली (सिंधुदुर्ग) : ब्रिटिशकालीन आंबोली घाट आता शेवटच्या घटका मोजू लागला आहे. बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकांमुळे आणि दुर्लक्षामुळे आंबोली घाट हा अंतिम घटका मोजू लागला आहे. आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन पूल आता जीर्ण झाला आहे. बांधकाम विभागाच्या अनियाेजित कारभारामुळे येथील रस्ते वाहून जात आहेत. ब्रिटिशकालीन गटार न खोदणे, रस्त्याचे गटार न खोदणे, अडू बांध न बांधणे, खासगी मोबाइल टॉवर कंपन्यांना वाटेल तशा केबल घालू देणे, संरक्षक कटडे सुस्थितीत न करणे यासारख्या अनेक चुकांमुळे आंबोली घाट धोक्यात आला आहे.आंबोली घाटाची दहा वर्षांपूर्वीची अवस्था ही खूप चांगली होती असे स्थानिक सांगत आहेत. परंतु गेल्या दहा वर्षात आंबोलीच्या घाटाकडे बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. आंबोली घाटातील ४० फुटाची मोरी याठिकाणी काही दिवसांपूर्वी एक भला मोठा दगड कोसळला होता. हा दगड कोसळल्यामुळे या पुलावर एक खड्डा पडला होता. नेमका या पुलावर हा खड्डा पडल्यामुळे या ब्रिटिशकालीन पुलाला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा खड्डा डांबर किंवा सिमेंट काँक्रीट पेवर ब्लॉग्सच्या साह्याने तो बुजवण्याची गरज होती, जेणेकरून या ब्रिटिशकालीन पुलाच्या खालील भागात एकमेकांत अडकवलेला दगडांमध्ये पाणी न जाता ते सुरक्षित राहील, परंतु याठिकाणी पडलेला हा खड्डा केवळ चिरे आणि मातीने बुजविण्यात येत आहे. ज्यामुळे या खड्ड्यातून पाणी खाली झिरपून या पुलाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.पूल कोसळण्याची भीतीयाबाबत मंत्री दीपक केसरकर यांना स्थानिकांनी कळविले आणि उपाययोजना करण्यासाठी विनंती केल्या आहेत. परंतु बांधकाम विभाग मात्र गांभीर्याने ही गोष्ट घेत नसल्याच्या दिसून येत आहे. याबाबत स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापासून तत्काळ याठिकाणी पेव्हर ब्लॉकस व सिमेंटच्या माध्यमातून हे खड्डे बुजविण्यात आले पाहिजे जेणेकरून ते पाणी पुलाच्या खालील बांधकामास धोका पोहोचू शकणार नाही. तात्पुरती मलमपट्टी ही लगेच उघडत असल्यामुळे खड्डा मोठा होत आहे ज्यामुळे हे पूल कोसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते .
गोवा, कर्नाटक, कोल्हापूर व्यापारी मार्ग ठप्प होण्याची भीतीहे जर पूल कोसळले तर आंबोलीच्या पर्यटनावर मोठे संकट येणार आहे. याशिवाय गोवा कर्नाटक कोल्हापूर हा व्यापारी मार्ग ठप्प होणार आहे. ज्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. सद्यस्थितीत आंबोली घाटातील गटारे सुस्थितीत करणे गरजेचे आहे. तर खासगी मोबाइल कंपन्यांनी दरीमध्ये जाणाऱ्या पाण्याच्या मार्गामध्ये बांधलेले काँक्रीटचे बंधारे फोडून ते पाणी दरीमध्ये जाण्यास मोकळे करणे गरजेचे आहे. अन्यथा आंबोली घाट सुद्धा धोक्यात येणार आहे. याविषयी आंबोली ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापासून आंबोली घाटाकडे यापुढे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा स्पष्ट इशारा येथील पर्यटन व्यवसायिकांनी दिला आहे.