आंबोली : आंबोली धबधब्याला रविवारी लक्षणीय गर्दी झाली. यात कुटुंबवत्सल पर्यटकांची संख्या जास्त होती. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वाहतुकीची कोंडी झाली नसली तरी वाहनांच्या लांबच लांब रांगा मात्र पाहायला मिळाल्या. गेला आठवडाभर पावसाने रौद रूप धारण केल्याने वर्षा पर्यटन रविवारी ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे दिसून येत होते. वर्षा पर्यटनाचा पहिला रविवार हाऊसफुल्ल झाला. शुक्रवारी रात्रीपासून लॉजिंग फुल्ल झाले होते. मात्र, शुक्रवारपासून वीजपुरवठा खंडित असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. बऱ्याच पर्यटकांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या उतरल्या होत्या. शनिवारी व रविवारी हाऊसफुल्ल गर्दी होती. पहिल्याच रविवारी कुटुंबवत्सल पर्यटकांची गर्दी झाल्याने आंबोलीत खऱ्या अर्थाने पर्यटन बहरले होते. कुठेही दंगा व धिंगाणा नव्हता. पोलिसांनी योग्य नियोजन केले. मद्यपी व धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर ठेवली. सुरुवातीपासून पोलिसांनी तसे नियोजन केल्याने याचा चांगला परिणाम झाला. हॉटेल व्यवसायही तेजीत होता. पर्यटन व्यावसायिक कुटुंबवत्सल पर्यटकांमुळे खूश होते. धुमशान घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाईच करावी. त्यामुळे पुन्हा आंबोलीचे पर्यटन पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. धबधब्याखाली भिजण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक अंगावर पाणी झेलत होते. युवतीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. घाटातील इतर धबधब्यांकडेही पर्यटकांची गर्दी होती. यात सेल्फी काढणाऱ्यांची संख्या जास्त होती. कावळेसाद, महादेवगड, हिरण्यकेशी, नांगरतास धबधबा व घाटमार्गात हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. यात गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सिंधुुदुर्ग, पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर येथील पर्यटक होते. पोलिस अधीक्षकांची भेट पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी येथून बंगळूरला घरी जाताना धबधब्याला पत्नीसह भेट दिली. यावेळी उपअधीक्षक प्रवीण चिंचाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव, पोलिस हवालदार गजेंद्र भिसे, जिल्हा वाहतूक पोलिस राजा राणे, आदी पोलिसांसह जिल्ह्यावरून पोलिस बंदोबस्तासाठी आले होते. शनिवार व रविवारी चोख व्यवस्था ठेवून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना रोखले जाईल. पर्यटकांबाबत अशीच चांगली व्यवस्था करून वाहतूक कोंडी रोखली जाईल, तसेच धबधब्याकडे पायऱ्यांवर रेलिंग बसविण्यासाठी वनविभागाला पत्र दिल्याचे सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)
आंबोली ‘हाऊसफुल्ल’
By admin | Published: July 03, 2016 11:30 PM