Shivaji Maharaj Statue Collapse ( Marathi News ) :सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. मात्र जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे तपासादरम्यान सहकार्य करत नसून त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी आज न्यायालयात पोलिसांकडून केली जाणार असल्याची माहिती आहे.
मागील पाच दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या जयदीप आपटे याला आणि १० दिवसांपासून पोलीस कोठडीत असणाऱ्या चेतन पाटीलला आज पोलिसांकडून न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जाणार आहे. आरोपींकडून माहिती लपवली जात असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
आपटेच्या वकिलांचा काय आहे दावा?
जयदीप आपटे याच्या वतीने न्यायालयासमोर बाजू मांडताना मागील सुनावणीवेळी ॲड. गणेश सोहनी यांनी म्हटलं होतं की, पंतप्रधानांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्यामुळे नौदलासह अन्य यंत्रणांनी पुतळ्याच्या कामाची चाचपणी व खातरजमा केली होती. या नंतरच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या गुन्ह्यात दाखल करण्यात आलेले शारीरिक दुखापती संदर्भातील कलमे चुकीची आहेत. वस्तूतः कुणालाही दुखापत व्हावी या उद्देशाने पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे पर्यटकांसह अन्य कुणालाही या ठिकाणी दुखापत झाल्याच्या घटनेची नोंद नसतानाही हत्येचा प्रयत्न व शारीरिक दुखापती संदर्भातील कलमे या प्रकरणात लागू करण्यात आली असल्याचं ॲड. सोहनी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
संयुक्त चौकशी समिती
पुतळा दुर्घटनेप्रकरणी भारतीय नौदल आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्त चौकशी समिती स्थापन केली आहे. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश आहे.