देवगड (सिंधुदुर्ग) : दुबईहून-बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज विजयदुर्ग किनाऱ्यानजीक बुडाले. सुदैवाने या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.हे तेलवाहू जहाज दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जात असताना जहाजाच्या तळाला भोक पडल्याने विजयदुर्ग किनाऱ्यापासून चाळीस वावामध्ये हे जहाज बुडू लागले. यावेळी या जहाजावर १९ कर्मचारी होते. जहाज बुडत असल्याचे लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरी येथील तटरक्षक दलाने येवून या जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचविले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.समुद्रात वादळी वारे, नौका देवगड किनाऱ्यावरदरम्यान, गेले काही दिवस समुद्रात जोरदार वादळी वारे वाहत आहेत. त्यात समुद्रही खवळला आहे. सिंधुदुर्गात पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यातच मागील चार दिवसांपूर्वी समुद्रात वादळी वारे मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने मासेमारी करणाऱ्या गुजराथ, रत्नागिरी पासूनच्या अनेक नौका देवगड येथील बंदरात सुरक्षितस्थळी दाखल झाल्या आहेत.
विजयदुर्ग किनाऱ्यानजीक तेलवाहतूक करणारे जहाज बुडाले, १९ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 16, 2022 7:18 PM