सावंतवाडी : पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नागेश महादेव राऊळ (वय-६३) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना आज, मंगळवारी मळगाव कुंभारआळी येथे घडली. याबाबतची माहिती नातेवाईक प्रमोद गावडे (रा. कोनापाल) यांनी सावंतवाडी पोलिसांत ठाण्यात दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. नागेश राऊळ हे रोज पहाटे घरालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीत पाणी आणण्यासाठी जात असत. नेहमीप्रमाणे ते पहाटे विहिरीकडे गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. यावेळी विहिरीच्या बाजूला कळशी व दोरी दिसून आल्याने स्थानिकांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.याबाबतची खबर त्यांचे नातेवाईक तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना दिली. त्यानंतर प्रमोद गावडे यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. मृत नागेश राऊळ, यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मूली, सून, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
Sindhudurg: पाणी काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू
By अनंत खं.जाधव | Updated: September 26, 2023 12:21 IST