सिंधुदुर्ग, दि. 26 - आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत आहेत. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर उंच डोंगर कपारीतून कोसळणारा दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा मनमोहक धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. या धबधब्याच्या ठिकाणी जाताना खोक्रल ते मांगेली फणसवाडी दरम्यान संपूर्ण डोंगराळ भाग असून वाटेत ठिकठिकाणचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहीत करते.
तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकमधील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार येथे प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अद्भुत निसर्ग सौंदर्य
मांगेली धबधब्याकडे जाण्यासाठी तुम्हाला दोडामार्ग तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतर पार करून जावे लागेल. परंतु डोंगर कपारीत वसलेली गावे पायदळी तुडवित जात असताना अद्भुत निसर्ग सौंदर्याने नटलेली वनश्री आपल्याला अनुभवता येईल. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर आपल्याला प्रचंड आनंद होईल, मात्र तेथे आवश्यक सुविधांची वाणवा आहे, ही बाब लक्षात ठेवावी. तरिही दिवसभर तेथील निसर्गाच्या सहवासात राहून तुम्हाला नक्कीच समाधान व रिफ्रेश वाटेल यात काही शंका नाही. आता श्रावणमास सुरू आहे. त्यामुळे मांगेली आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरले आहे. यामुळे धबधब्याचा व निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एकदा निश्चितच मांगेलीत या...
‘त्या’ पर्यटकांना वेळीच आवर घालायाठिकाणी येणारे काही मद्यधुंद पर्यटक धिंगाणा घालतात. रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्या घेऊन बसतात. दारू प्यायल्यानंतर बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी काचांचा सडा पडलेला असतो. काही मद्यधुंद पर्यटक येथील स्थनिक लोकांनाही त्रास देतात. या पार्श्वभूमीवर येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.