नांदगाव : स्वकमाईचा आनंद काहीसा न्याराच असतो, त्यातही जे वय खेळण्या बागडण्याचं त्या वयात एखादी वस्तू बनवून तिच्या विक्रीतून मिळणारी खरी कमाई आनंद द्विगुणित करणारी असते. नांदगावच्या जिल्हा परिषद केंद्रशाळा नं १ मधील विद्यार्थ्यांनीही खरी कमाई उपक्रमांतर्गत दीपावलीनिमित्त लागणाऱ्या वस्तू बनवून त्यांची विक्री करीत खऱ्या अर्थाने खरी कमाई केल्याचा आनंद मिळविला आहे. या शाळेत मीना राजू व स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत खरी कमाई हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आकाशकंंदील व सुगंधी उटणे तयार केले. तसेच स्वदेशी साहित्याच्या वापरातून निरोगी आरोग्य मिळविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.सुगंधी उटणे तयार करणे आणि आकाशकंदील तयार करण्याबाबतची कार्यशाळा घेण्यात आली. चंदन, मुलतानी माती, कापूर, खैर, संत्रा साल, कडुलिंब, बेसण, तुलसी पावडर, आंबेहळद, नागरमोथा, आदी साहित्यापासून विद्यार्थ्यांकडून पावडर तयार करून सुगंधी उटण्याची पाकिटे तयार करण्यात आली. स्वदेशीच्या वापरातून निरोगी आरोग्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना देत या उटण्याच्या पाकिटांची विक्री करण्यात आली. केंद्रातील सर्व शाळांमधील शिक्षक, ग्रामस्थ आणि अधिकारी यांनी ही उटण्याची पाकिटे खरेदी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:चा आकाशकंदील तयार केला. आपला आकाशकंदील इतरांपेक्षा आकर्षक दिसावा यासाठी तो विविध प्रकारे सुशोभित केला.नागेश मोरये, केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, मुख्याध्यापक सुहास सावंत, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदूषणमुक्त दिवाळीचे आवाहनप्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी यावेळी मार्गदर्शन केले. या दिवाळीपासून फटाके न फोडण्याबाबत तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच इतरांनाही प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आवाहन करण्यात येणार आहे.
...अन् त्या चिमुकल्यांना मिळाली खरी कमाई
By admin | Published: October 27, 2016 9:28 PM