लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : तुमच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग बोगस ठरला आहे, पगार घेता मग काम कोण करणार? तुम्हांला गडचिरोलीत पाठविले पाहिजे, अशा शब्दांत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना खडसावले.मंत्री जानकर पहिल्यांदाच वैभववाडीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सभापती लक्ष्मण रावराणे आदी उपस्थित होते. मंत्री जानकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. किती जनावरांचा विमा उतरविला, शस्त्रक्रिया किती केल्या? यासारखे प्रश्न विचारुन पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: भंडावून सोडले.दवाखान्यापर्यंत रस्ता तयार करुन घेऊ शकत नसाल तर शेतकऱ्याला तुम्ही न्याय काय देणार? एकाही परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकला नाहीत. मग पगार कसला घेता? मी तुमच्या कामावर नाराज आहे. पुढील दोन महिन्यात तुम्हांला मागील दोन वर्षांचे काम करुन दाखवावे लागेल. एवढेच आता सांगतो. पुन्हा येईन तेव्हा मला तुमच्या कामात बदल दिसला पाहिजे, नाहीतर तुमची धडगत नाही. हे लक्षात ठेवा, अशी तंबी मंत्री जानकर यांनी दिली.त्यानंतर तुम्हांला अडचणी काय आहेत सांगा? अशी विचारणा केली. तेव्हा दवाखान्याच्या छताची दुरुस्ती आवश्यक असून दुरुस्तीची मंजुरी मिळाली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर मंत्री जानकर चांगलेच संतापले. दुरुस्तीला खर्च किती येईल? मी माझ्या पगारातून देतो. तुम्हांला पगार किती? आणि कसली मंजुरीची कारणे सांगता? तुम्ही सर्व पगारातून वर्गणी काढून दुरुस्ती करु शकत नाही का? असे सुनावताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढा. कमी पडतील ते मला सांगा. मी तुम्हांला २0 हजार रुपये देतो. मग तरी दुरुस्ती होईल का? असे विचारताच आम्ही आठ दिवसात दुरुस्ती करुन घेतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गचा पशुसंवर्धन विभाग बोगस
By admin | Published: May 19, 2017 11:53 PM