सावंतवाडी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात जेवढे पत्रव्यवहार केले नाहीत, त्यापेक्षा अधिक पत्रव्यवहार हे भाजप सरकारकडे केले. पण या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसली नाही. त्यामुळेच आता गावागावात अण्णा हजारे निर्माण होऊन आंदोलने करावीत. या आंदोलनांना आमचे सहकार्य राहिल असे मत अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे निरिक्षक तथा विश्वस्त अलाऊद्दीन शेख यांनी मांडले. ते शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.शेख म्हणाले, अण्णा हजारे यांनी देशात अनेक आंदोलने केली पण रामलीला मैदानावर झालेले आंदोलन चांगलेच जगभरात गाजले होते. तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात संस्था, पक्ष यांनी पाठींबा दिला. देशातील मिडिया ने ही हे आंदोलन उचलून धरले. पण नंतर भाजप प्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर अण्णांनी काही वर्षे नव्या सरकार ला काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच आंदोलन केले नाही पण तीन वर्षानंतर कडक भूमिका घेण्यात आली तेव्हा राज्यातील तेव्हाचे भाजप नेते राळेगणसिद्धीत येत असत आणि ते आंदोलन मिटविण्यात येई आम्ही प्रत्येकाला काम करण्याची संधी देत असल्याचे शेख यांनी सागितले.काँग्रेस काळात अण्णा हजारे यांनी केंद्रात पत्रव्यवहार केला की त्याला चांगला प्रतिसाद मिळत असे पण आता भाजप सरकारच्या काळात तसा प्रतिसाद मिळत नाही. पंतप्रधान अण्णाच्या पत्राची दखल घेत नाहीत हे अण्णांनी अनेक वेळा नमूद केले आहे. पण अण्णा गप्प बसणार नाहीत. अनेक भ्रष्टाचारा बाबत पत्रव्यवहार करत राहातील असे शेख यानी सांगितले. पण पुन्हा अण्णा आंदोलन करणार का यावर आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पण आता अण्णांचे वय झाले असून ते नेहमीच मार्गदर्शन करतील गावा गावातून अण्णा निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकरणाचा आढावा घेऊन ती सर्व प्रकरणे अण्णा कडे देण्यात येतील असे सांगितले.या पत्रकार परिषदेस न्यासाचे जिल्हाध्यक्ष जयत बरेगार, अॅड. संदिप निंबाळकर, अॅड आर्या सावंत आदी उपस्थित होते.
अण्णा हजारेंनी भाजप सरकारकडे अधिक पत्रव्यवहार केला, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 7:09 PM