सिंधुदुर्ग : रात्रीस खेळ चाले मालिकेत खलनायकाची भूमिका करणाऱ्या अण्णा नाईकांचा वास्तविक जीवनात मात्र हिरो ठरले. सेल्फीच्या बदल्यात त्यांनी पैसे घेउन ते आंबोली येथील सैनिक स्कूलकडे सुपूर्द केले. आतापर्यंत जमा झालेली जवळपास लाखभराची ही रक्कम प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर भेट दिली आहे. त्यांच्या या कृतीने सामाजिक जबाबदारीचा आदर्शच त्यांनी इतरांसमोर उभा केला आहे.अण्णा नाईक म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो खलनायकी प्रवृत्तीचा गावगुंड. त्यांच्या डोळ्यातली जरब कुणाचाही थरकाप उडवणारी, आयाबाया तर अण्णा दिसले की, रस्ताच बदलतात.
टीव्हीवरील लोकप्रिय रात्रीस खेळ चाले या मालिकेत ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर प्रत्यक्षात मात्र नायक ठरले आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आंबोलीच्या सैनिक स्कूलला १ लाख १ हजार रुपयांची देणगी दिली.रात्रीस खेळ चाले या मालिकेनं रसिकांना अक्षरश: वेड लावले आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडीजवळ आकेरी येथे या मालिकेच्या सेटवर अनेक रसिक प्रेक्षक येत असतात आणि अण्णा नाईकांसोबत सेल्फी काढायचा हट्ट धरतात.
कोणताही कलाकार आपल्या चाहत्याच्या या सेल्फी मागणीला नाही म्हणून नाराज करत नाही, परंतु प्रत्यक्षात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यावर अण्णांनी एक शक्कल लढवली, त्यांनी 'सैनिकहो तुमच्यासाठी'नावानं एक ड्रॉप बॉक्स तयार केला.
सेल्फी काढायची तर या ड्रॉप बॉक्समध्ये रक्कम टाका, असं ते सांगायचे. वर्षभरानंतर त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा त्यात लाखभर रुपये जमले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी ती रक्कम आंबोली सैनिक स्कूलला भेट म्हणून दिली.