कुडाळ : कुडाळ हायस्कूलच्या प्रशासनाबाबत आणि डॉ. अनिल नेरुरकर यांच्या संदर्भातील निनावी पत्रामुळे कुडाळ शहरवासीय आक्रमक झाल्यानंतर या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असून या संदर्भात कोणाच्या काही तक्रारी आहेत का? याचा तपास करण्यासाठी खास महिला पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे.कुडाळ शहरातील कुडाळ हायस्कूलमधील संस्थाचालकांच्या संदर्भात अपहाराचे आणि डॉ. अनिल नेरूरकर यांच्यावर आरोप करण्यात आलेले निनावी पत्र कुडाळ शहरात गुरुवारी सोशल मिडीयावर फिरू लागल्यानंतर शहरातील दोनशे ते अडीचशे नागरिक एकत्र येऊन या संदर्भात कुडाळ हायस्कूलच्या संस्था चालकांना जाबही विचारला.
दरम्यान या निनावी पत्राची चौकशी करण्यासाठी शहरातील नागरिकांसह कुडाळ हायस्कूलचे संस्थाचालक तसेच डॉ. अनिल नेरुरकर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात लेखी पत्र दिले आहेत. या पत्राचा तपास करण्यासाठी आणि यामागे कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यान्वित केली आहे.सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे या कुडाळ पोलीस ठाण्यात येऊन गेल्या. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वेंगुर्ला येथे असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक गोरड यांना खास या तपासासाठी कुडाळ येथे नियुक्त केले आहे. या संदर्भात माहिती घेतली असता या पत्राचा शोध हा लवकरच केला जाणार आहे. हे पत्र सोशल मीडियावर कशाप्रकारे व्हायरल झाली याचा तपास सुद्धा केला जाणार आहे. तसेच कोणावर अन्याय झाला आहे का? याचा ही तपास करण्यात येणार असून अन्याय झाला असेल त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.