आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले असून सीसीटीव्हीही सुरू करण्यात आला आहे.सांगली येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर आणून जाळण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच सांगलीतील घटनेच्या तिसºया दिवशीच आंबोलीतीलच कावळेसाद पॉर्इंटवर आणखी एक मृतदेह सापडला.हा मृतदेह गडहिंग्लज येथील शिक्षकाचा होता. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होत असल्याचे दिसून येत होते. राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती.मंत्री केसरकर यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर अतिरिक्त पोलीस बळ वाढविण्यात येणार आहे. तसेच दूरक्षेत्राची जागा चुकीची असून दूरक्षेत्र अन्यत्र हलविण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. तर तात्पुरत्या स्वरुपात आणखी एक तपासणी नाका लावण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते. त्यानुसार आंबोलीच्या दिशेने येणाºया कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर हा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या तपासणी नाक्यावर दिवसा चार, तर रात्रीच्यावेळी चार असे पोलीस ठेवण्यात आले आहेत. हा तपासणी नाका सोमवारी रात्रीपासून कार्यरत झाला आहे.तर आंबोली दूरक्षेत्रावर आणखी पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच दूरक्षेत्राचे बंद असलेले सीसीटीव्हीही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असल्याचे यातून दिसून येत आहे.एखादी घटना घडल्यानंतर पोलीस दल जागे होते. त्याचा प्रत्यय आंबोलीला मंगळवारी आला. दीड वर्षापासून आंबोलीतील दूरक्षेत्राचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. याबाबत दूरक्षेत्राने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली नव्हती. त्यामुळे हे सीसीटीव्ही बंद अवस्थेत होते. मात्र सांगलीच्या घटनेनंतर पोलीस दल जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही पुन्हा सुरू केले आहेत.
आंबोलीत आणखी एक तपासणी नाका; सांगलीतील घटनेनंतर जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:31 AM