कणकवली: रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांना जाब जबाब नोंदविण्यासाठी पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत त्याना सूचित करण्यात आले आहे.नोटिसीत म्हटले आहे की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. या उघड चौकशीच्या अनुषंगाने १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्द्यांच्या अनुषंगाने भरुन दिलेले आहेत. त्या फॉर्म्स मधील आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करण्यासाठी आपणास १२ ऑक्टोबर २०२२, ९ नोव्हेंबर २०२२, ३० नोव्हेंबर २०२२ व १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय नाचणे रोड, मारुती मंदीर येथे उपस्थित रहाण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये समक्ष व मेलव्दारे कळविण्यात आलेले आहे.परंतु त्यावेळी आपण उपस्थित राहिलेले नाहीत. त्या उघड चौकशीच्या अनुषंगाने आपल्याकडे चौकशी करून, आपला प्राथमिक जबाब नोंद करणे आवश्यक असल्याने आपण ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे. अशी सूचना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी या नोटिशीद्वारे केली आहे. दरम्यान, आमदार वैभव नाईक रत्नागिरी येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
आमदार वैभव नाईक यांना पुन्हा नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 4:49 PM